डॉ. देगलूरकर : चतुरंग ज्ञानाचे उत्तुंग शिखर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:02 PM2019-09-23T12:02:49+5:302019-09-23T12:17:37+5:30

येत्या २६ सप्टेंबर रोजी डॉ. गो. बं. देगलूरकर यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला असून, बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी १० वाजता उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान होईल. त्यानिमित्त लेख. 

Dr. Degulurkar: all knowledge mountain | डॉ. देगलूरकर : चतुरंग ज्ञानाचे उत्तुंग शिखर 

डॉ. देगलूरकर : चतुरंग ज्ञानाचे उत्तुंग शिखर 

Next
ठळक मुद्देसरांचा सहवास आणि त्यांच्याबरोबरचा प्रवास ही एक आनंदयात्रा वेद-उपनिषदे,रामायण-महाभारत, गीत अशा अनेकविध शास्त्रांचा आणि ग्रंथांचा सखोल अभ्यास ही सरांची खासियत

- रवींद्र घाटपांडे 

मी भीतभीतच सरांच्या घरी गेलो. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंविषयी मी ऐकले होते. घराची बेल वाजवली. धोतर आणि बंडी परिधान केलेल्या एका ऋजू व्यक्तीने दार उघडून माझे स्वागत केले. म्हणाले, ‘या!’ हा ‘या’ शब्द आहे ना तो माझ्या भाग्याचा आणि सरांच्या जवळ नेण्याचा माध्यम शब्द होता. पहिल्याच भेटीत व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव किती विलक्षण असतो ते मी अनुभवले. अत्यंत मृदू, प्रेमळ बोलणे, विलक्षण विद्वत्तेचे चेहऱ्यावर तेज, अत्यंत साधेपणा, साधी राहणी, बोलण्यात जाणवणारी आत्मीयता, अहंकाराचा आणि अहंमन्यतेचा लवलेश नसलेला शांत समाधानी चेहरा, कुठलाही वावगा किंवा कठोर शब्द बोलण्यात न येता, पण आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची हातोटी, त्यालाही मिस्कीलपणाची किनार लाभलेलं, ऐकत राहावं असे बोलणे, या सर्व गुणवैशिष्ट्यांसह डॉ. गो. बं. देगलूरकर नावाचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. मंदिर, मूर्ती, उत्खनन, प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृती, त्याचा जागतिक इतिहास, आपले वेद-उपनिषदे, पुराणे, रामायण-महाभारत, गीत अशा अनेकविध शास्त्रांचा आणि ग्रंथांचा सखोल अभ्यास ही सरांची खासियत आहे.
सरांचा सहवास आणि त्यांच्याबरोबरचा प्रवास ही एक आनंदयात्रा असते. ती ज्याला मिळते तो खरा भाग्यवान! मला नेहमी वाटतं, सरांचा सहवास मिळणं हे माझं पूर्वसुकृत आहे! सरांबरोबर मला अनेक ठिकाणी प्रवास करता आला. प्रवासात सर आपले वय विसरतात आणि आपल्या वयाचे होतात. मित्राला जशी सलगी देतात ना तसे ते प्रवासात आपल्याशी वागतात. मला सरांबरोबर घारापुरी लेणी (एलिफंटा केव्हज) पाहण्याचा योग आला. प्र. के. घाणेकर, आशुतोष बापट असे आम्ही पाच-सहाजण सकाळी ११.३० वाजता घारापुरीला पोहोचलो. लेण्यात गेल्यावर सर आम्हाला सदाशिवाच्या मूर्तीसमोर म्हणाले, ‘मी इथे थांबतो, तुम्ही लेणी बघून या.’ आम्ही दहा मिनिटांत सर्व लेणी बघून आलो. त्या वेळी पावणे बारा-बारा वाजले होते आणि सर म्हणाले, ‘आत्ता आपण लेणी पाहू या.’ सरांनी एक-एक मूर्ती दाखवायला सुरुवात केली. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य, तो प्रसंग, प्रत्येक मूर्तीच्या चेहºयावरील प्रसंगानुरूप भाव, त्या प्रसंगामागील कथा, याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! त्या मूर्ती आमच्याशी जणू बोलू लागल्या. ते प्रसंग समोर घडताहेत असे वाटू लागले. मूर्तीच्या चेहºयावरील भाव प्रतीत व्हावयास लागले. एक आनंदसोहळाच आम्ही अनुभवू लागलो. संपूर्ण लेणी दाखवून सर जेव्हा थांबले, तेव्हा मिस्कीलपणे ते म्हणाले, ‘काय भूक लागली की नाही?’ आम्ही  घड्याळाकडे पाहिले, सायंकाळचे ५ वाजले होते. पण प्रत्येकाच्या चेहºयावर तृप्त झाल्याचा भाव दिसत होता.
सरांचा जन्म १० सप्टेंबर १९३३ रोजी धाराशीव/उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी झाला. सरांचे घराणे नामवंत वारकरी घराणे. सरांचे मूळ आडनाव नाईक. देगलूर गावाच्या वास्तव्यामुळे देगलूरकर नाव लागले. त्यांचा पूर्वापर सराफीचा व्यवसाय होता. साधारण अडीचशे वर्षांपूर्वी त्यांचे मूळ पुरुष गुंडामहाराज यांनी वारकरी संप्रदाय आणि भक्तिमार्गाचा स्वीकार केला. पंढरीची वारी सुरू केली. हळूहळू पंढरीत वास्तव्य, कीर्तन, प्रवचन सुरू झाले. लोक त्यांना ‘महाराज’ म्हणू लागले. सरांचे काका धुंडामहाराज यांच्या साक्षात्कारी व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रवचनामुळे देगलूरकर घराण्याला वारकरी संप्रदायामध्ये मोठे नाव मिळाले. पुण्यातून हभप मामा दांडेकर आणि पंढरपुरात धुंडा महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मानले जाऊ लागले. सरांचे आजोबा महिपतीमहाराज यांनी मोठा लोकसंग्रह केला. सरांचे वडील बंडामहाराज यांनी संगीत आणि भजन क्षेत्रामध्ये मोठे नाव मिळविले. अशा घराण्याचा वारसा लाभलेले डॉ. गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर यांचा जन्म झाला. देगलूरकर घराण्यामध्ये जन्म होणे म्हणजे भाग्याची ललाटरेखा मोठी असल्याचे लक्षण! सरांनी आपल्या कार्यकर्तृत्व, विचार आणि व्यवहार यातून घराण्याचे नाव सार्थ केले. सरांचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथे, तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हैदराबाद आणि पुणे येथे झाले. इतिहास विषयात एम.ए. केल्यावर सरांनी प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. शां. भ. देव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा’ या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली. पीएच.डी. मिळविणारे मराठवाड्यातील ते पहिले विद्यार्थी. सरांनी नागपूर, पुणे, कोल्हापूर येथील विद्यापीठांत आणि महाविद्यालयात अध्यापन केले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना, त्यांचे लक्ष महाराष्ट्रातील प्राचीन मंदिराच्या संशोधनाकडे वळले. 
सरांनी तकाल घाट खापा, पवनी, माहूर झरी, चानाला लेणी, भोकरदन, मांढळ, अरणी, बोरगाव, खैरवाडा, रायपूर, भागीमोहरी येथील उत्खननांत मोठा सहभाग दिला. त्यांचा त्यातील वाटा फार मोठा आहे. भोकरदन येथे त्यांना आढळलेली हस्तिदंती स्त्री प्रतिमा आणि मांढळ येथे मिळालेली शिवमूर्ती या दोन्हींना जागतिक प्रसिद्धी मिळाली.
देश-परदेशातही त्यांची व्याख्याने झाली आहेत. तसेच त्यांच्या शोधनिबंधांचे वाचनही तेथे झाले आहे. लंडन, लॉस एंजलिस, शिकागो इत्यादी ठिकाणी निमंत्रणावरून त्यांनी संशोधनकार्यही केले आहे. इटली, इंडोनेशिया, कंबोडिया, ब्रम्हदेश येथे त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत. भारतीय संस्कृतीचा सरांना विशेष अभिमान आहे. जगात आज जे दिसतं ते प्राचीन काळी भारतात कसं होतं, हे ते आवर्जून सांगतात. इतिहासाला विसरलं तर इतिहास धडा दिल्याशिवाय राहत नाही, हे तरुण पिढीला पटवून देतात.
८४ व्या वर्षीदेखील तरुणाला लाजवेल असा सरांचा उत्साह आपणास थक्क करतो. मंदिरशास्त्र, मूर्तिशास्त्र, आपली प्राचीन संस्कृती यांत तरुण पिढी रस घेऊ लागली आहे. त्यांच्यासाठी डॉ. देगलूरकर सर म्हणजे दीपस्तंभ आहेत!
..........
पुस्तकप्रेमी आणि विक्रेते सुकुमार बेरी यांची माझी लहानपणापासून मैत्री. स्नेहल प्रकाशनची धुरा सांभाळताना अनेक मित्रमंडळींच्या सूचना येत असतात. त्यात बेरींचा पुढाकार असतो. एके दिवशी बेरी म्हणाले, ‘तू देगलूरकर सरांना भेटला आहेस काय?’ मी म्हणालो, ‘नाही.’ तो म्हणाला, ‘त्यांना भेट. त्यांची पुस्तके प्रकाशित कर.’ माझ्या मनात एक किडा सोडून तो निघून गेला. म्हटले, कधी भेट होते ते बघू या. पण योगायोगाने डॉ. देगलूरकर सरांच्या घरी जाण्याचा योग आला. 

 

Web Title: Dr. Degulurkar: all knowledge mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे