डॉ. सायरस पूनावाला यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार जाहीर
By श्रीकिशन काळे | Published: February 11, 2024 12:55 PM2024-02-11T12:55:14+5:302024-02-11T12:55:27+5:30
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार
पुणे : राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल २०२४ चा 'स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार' पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा स्व. धारिया यांच्या जयंतीदिनी, बुधवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होईल. तो सर्वांसाठी खुला आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाशजी मिश्रा सन्माननीय अतिथी आहेत. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी आज पुरस्काराची घोषणा केली. यंदा डॉ. मोहन धारिया यांची ९९वी जयंती असून पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ साजरे केले जाणार आहे.
आपल्या विशिष्ट कार्यक्षेत्रातून भारताच्या विकासात मुलभूत योगदान देणाऱ्या समाजातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने 'डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार' देण्यात येतो. एक लक्ष रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराची संकल्पना 'वनराई'चे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांची असून, त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे. यावर्षीचा पुरस्कार लशीकरणाच्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल डॉ. सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात येईल. लशीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत 'वनराई फाउंडेशन'ने डॉ. सायरस पूनावाला यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याचे रवींद्र धारिया यांनी सांगितले.