डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्यात ‘सीबीआय’च्या वतीने अंतिम युक्तिवादाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:30 AM2024-02-14T10:30:44+5:302024-02-14T10:30:57+5:30
आरोपी अंदुरे याने गुन्हा केल्याचा अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब दिला आहे, असा दावा ‘सीबीआय’च्या वतीने मंगळवारी न्यायालयात करण्यात आला....
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा पारित करून समाजातून अंधश्रद्धेच्या समूळ उच्चाटनासाठी कार्यरत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून हिंदुत्ववादी संघटना तसेच आरोपी तावडे यांच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती हे सिद्ध होते; तर दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी फोटोसह न्यायालयात ओळखले आहे. आरोपी अंदुरे याने गुन्हा केल्याचा अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब दिला आहे, असा दावा ‘सीबीआय’च्या वतीने मंगळवारी न्यायालयात करण्यात आला.
आरोपींनी पिस्तुलातून गोळ्या झाडून दाभोलकरांची हत्या करत अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे आरोपींवर शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा सिद्ध होतो, असेही सीबीआयच्या वकिलांनी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याची सुनावणी सध्या विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये ‘सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांच्या अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये डॉ. दाभोलकरांची हत्या, त्यांच्याविषयी आरोपींमध्ये असलेली शत्रुत्वाची भावना, गुन्ह्याचा हेतू, ओळख परेड, अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब, शवविच्छेदनाच्या नोंदी, फिर्याद, आरोपींवर शस्त्रास्त्र आणि यूएपीए कायद्यान्वये कारवाई, आरोपींच्या मानसिकतेचे विश्लेषण, गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना, आदी मुद्द्यांवर विशेष सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले शस्त्र (पिस्तूल) हस्तगत झाले नसले, तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे सांगितले आहे, तसेच दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर निघाल्याचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे शस्त्र हस्तगत झाले नसले, तरी त्यातून गोळीबार झाल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद करत विशेष सरकारी वकिलांनी हा खटला ‘बियाँड रिझनेबल डाउट’ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
आगामी सुनावणीत काय होणार?
या खटल्याची पुढील सुनावणी येत्या शनिवारी (दि. १७ ) होणार आहे. त्या दिवशी ‘सीबीआय’च्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी बचाव पक्षाच्या युक्तिवादावर आपले म्हणणे मांडणार आहेत. सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर बचाव पक्षाच्या अंतिम युक्तिवादास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर या खटल्याचा निकाल अपेक्षित आहे.