पुण्यातील आयसरचे डॉ. दीपक धर, प्रा. के. एन. गणेश या दोन शास्त्रज्ञांना पद्म पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:32 PM2023-01-26T12:32:11+5:302023-01-26T12:32:24+5:30
डॉ. दीपक धर यांना पद्मभूषण तर प्रा. के. एन गणेश यांना पद्मश्री पुरस्कार
पुणे : पुण्यातील आयसर संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा असणारे पहिले संचालक प्रा. के. एन. गणेश आणि आयसरमध्ये सध्या असलेले प्रा. दीपक धर या दोघांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ व भारतीय विज्ञानशिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) येथील भौतिकशास्त्र विभागातील प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत. २०२२ मध्ये विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्काराने डॉ. दीपक धर यांना गाैरविण्यात आले आहे.
प्रा. के. एन गणेश यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. गणेश हे रसायनशास्त्रज्ञ आहेत. २००६ मध्ये पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे पहिले संचालक आहेत. सध्या ते आयसर तिरुपती येथे संस्थापक संचालक आहेत.
के. एन. गणेश यांच्यामुळेच आयसर देशातील सर्वोत्तम संस्था
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या दोघांचे अभिनंदन करून ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले की, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (सीएसआयआर) या संघटनेचा अध्यक्ष असताना आयसरच्या स्थापनेची चर्चा चालू होती. तेव्हा एनसीएल शेजारील १०० एकर जागा या संस्थेला दिली. दोन संशोधन संस्थांचा संबंध असावा, म्हणून ही जागा मुद्दाम दिली. या संस्थेच्या उभारणीत के. एन. गणेश यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या योगदानामुळे पुण्यातील आयसर ही देशातील सर्वोत्तम संस्था बनली आहे. अशा संस्थेतील दोघा शास्त्रज्ञांना पद्म पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे.