गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: May 14, 2023 07:10 PM2023-05-14T19:10:29+5:302023-05-14T19:10:39+5:30
जेजूरी पाेलीस ठाण्यात डाॅ. सचिन रणवरे, गर्भपात करणारी महिला दीपाली थाेपटे आणि एजंट बरकडे यांच्यावर रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल
पुणे : पुरंदर तालुक्यातील महिला दुस-यांदा गर्भवती असल्याने गर्भलिंग निदान केले असता त्यामध्ये तिला दुसराही मुलीचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. तिचा गुपचूप गर्भपात नीरा येथील श्रीराम हाॅस्पिटलमध्ये डाॅ. सचिन रणवरे यांनी केला. याप्रकरणी जेजूरी पाेलीस ठाण्यात डाॅ. सचिन रणवरे, गर्भपात करणारी महिला दीपाली थाेपटे आणि एजंट बरकडे यांच्यावर रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ एमपल्ले यांनी जेजूरी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिपाली थाेपटे ही महिला गर्भपात करण्याकरता १४ मे राेजी ८ वाजता नीरा येथील श्रीराम हॉस्पिटल डॉक्टर सचिन रणवरे यांच्याकडे ऍडमिट होणार आहे अशी तक्रार राज्याच्या आराेग्य विभागाच्या पुण्यातील कुटूंब कल्याण कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. कुटूंब कल्याण ही तक्रार पुढे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मेलवर १२ मे राेजी पाठवली आणि त्याप्रकरणी १२ तासांच्या आत चाैकशी करण्याचे निर्देश दिले हाेते.
यातक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले हे पथकासह रविवारी दि. १४ मे राेजी सव्वाआठ वाजता श्रीराम हाॅस्पिटलमध्ये धडकले. त्यावेळी डाॅ. सचिन रणवरे यांच्याकडे त्यांनी साेनाेग्राफी व गर्भपात केंद्राची तपासणी करण्यासाठी आल्याचे सांगत १४ मुदयांना अनुसरून तपासणी केली असता रजिस्टरमध्ये दीपाली थाेपटे या महिलेचे नाव त्यांना दिसून आले नाही. थाेपटे या महिलेच्या फाेनवर संपर्क केला असता तिच्या घरच्यांनी श्रीराम हाॅस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याचे सांगितले. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.