डॉ. गो. बं. देगलूरकर यांना भांडारकर स्मृती प्रथम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:28+5:302021-09-22T04:11:28+5:30
पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील विद्वानास ‘भांडारकर स्मृती ...
पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील विद्वानास ‘भांडारकर स्मृती पुरस्कार’ या वर्षापासून दिला जाणार आहे. हा पहिला पुरस्कार ख्यातनाम पुरातत्त्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना येत्या शुक्रवारी (दि. २४) रोजी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती राहाणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितले. या पुरस्काराची घोषणा संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली होती. एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि भांडारकरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. संस्थेच्या फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात येणार आहे.