डॉ. स्मिता झांजुर्णे यांनी पटकावला आयर्नमॅनचा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:45+5:302021-04-13T04:09:45+5:30
येथील डाॅक्टर दाम्पत्याने सलग दुसऱ्या वर्षी आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. दुबईमध्ये झालेल्या या स्पर्धेत यावर्षी डाॅ. स्मिता झांजुर्णे या ...
येथील डाॅक्टर दाम्पत्याने सलग दुसऱ्या वर्षी आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. दुबईमध्ये झालेल्या या स्पर्धेत यावर्षी डाॅ. स्मिता झांजुर्णे या आयर्नमॅन ठरल्या आहेत. मागच्या वर्षी २०२० मध्ये दुबईला राहुल झांजुर्णे आयर्नमॅन झाले. त्यावेळी त्या स्पर्धेला त्यांच्या पत्नी स्मिता या गेल्या होत्या. तेव्हाच त्यांनी ठरविले की आपणही आयर्नमॅन ७०.३ या स्पर्धेत उतरायचे. त्यानंतर त्यांनी स्पर्धेची तयारी सुरु केली.
झांजुर्णे म्हणाल्या की, दुबईलाच पहिली आयर्नमॅन करायचा योग येईल असं वाटलं नव्हतं. आयुष्यात पाण्यात कधीच उतरले नाही. ट्रेनिंग सुरू केले आणि लॉकडाऊन सुरु झाला. स्विमिंग पूल बंद झाल्यामुळे स्विम ट्रेनिंगचा खेळखंडोबाच झाला. आयर्नमॅनचा इव्हेन्ट होण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. कठीण परिस्थितीतही ट्रेनिंग चालू ठेवलं. साधारणतः ऑक्टोबरमध्ये लाॅग राईड सुरू केल्या आणि जानेवारीमध्ये स्विमिंगसाठी कोचिंग सुरू केलं. हाडं गोठवणाऱ्या, बंदिस्त स्विमिंग पूलच्या बर्फासारख्या थंड पाण्यात, दोन अडीच महिन्यांत न येणारी गोष्ट शिकणं माझ्यासाठी खरंच कठीण होतं. दररोज न चुकता पहाटे चार वाजता उठून पाच सव्वापाचला पाण्यात बुडी मारणं आणि आल्यावर परत रनिंग आणि सायकलिंग करण्यात दिवस भुर्रकन उडून जात होते.
स्पर्धेमध्ये मोठमोठ्या उसळत्या लाटा, समुद्राचं खारं पाणी आणि परत फिरल्यावर तापलेल्या सूर्याची डोळ्यांत घुसणारी किरणं यांच्यावर मात करून ५८ मिनिटांत म्हणजेच बारा मिनिटे राखून स्विमिंग पूर्ण केलं आणि नंतर ट्रान्सिशन झोनमध्ये उडी मारली.
आयर्नमॅनमध्ये एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असलेली बॅग शोधण्यात सहा मिनिटे गमावली. जरा दुखावलेल्या मनाने सायकलवर स्वार झाले.
शेवटचा रनिंग लेग ९० किलोमीटरचे सायकलिंग संपवून रनिंगचे शूज घालून २१ किलोमीटर धावण्याची मानसिक तयारी केली आणि रणरणत्या उन्हात धावायला सुरुवात केली.
शेवटच्या काही किलोमीटरला माझ्या पतीने खूप चेअरअप केले. हातात त्यांनी आपल्या भारताचा झेंडा दिला आणि डोळ्यांसमोर खुणावणारी फिनिश लाईन दिसली आणि मी "आयर्नमॅन" झाले.
-----------------------
आयर्नमॅन स्पर्धा काय असते.
-२ किलोमीटर समुद्रातील स्विमिंग, ९० किमी वाळवंटातील सायकलिंग, २१ किमी रनिंग
-अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलेलं अंतर साडेआठ तासांत पूर्ण करावे लागते ते दीड तास शिल्लक ठेवून केले.