Reserach Story: डॉ. नारळीकर सर्वात ज्येष्ठ, माधव ज्युलियन सर्वात तरुण संमेलनाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 15:00 IST2021-12-04T13:54:23+5:302021-12-04T15:00:11+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : नाशिक येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यंदा डॉ. जयंत नारळीकर भूषवत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. नारळीकर ...

Reserach Story: डॉ. नारळीकर सर्वात ज्येष्ठ, माधव ज्युलियन सर्वात तरुण संमेलनाध्यक्ष
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : नाशिक येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यंदा डॉ. जयंत नारळीकर भूषवत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. नारळीकर संमेलनात प्रत्यक्षात उपस्थित राहणार नसले तरी आभासी पद्धतीने भाषण करणार आहेत. साहित्य संमेलनाच्या ९४ वर्षांच्या इतिहासातले वयाच्या ८३ व्या वर्षात असणारे डॉ. नारळीकर हे आजवरचे सर्वात ज्येष्ठ संमेलनाध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी २००८ साली मधुकर हातकणंगलेकर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी सांगलीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. येथे १९३६ साली झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष माधव ज्युलियन हे आजवरचे सर्वात तरुण संमेलनाध्यक्ष ठरले आहेत.
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी अनेक वर्षे निवडणूक प्रक्रिया पार पडत होती. चार वर्षांपूर्वी संमेलनाध्यक्षपद सन्मानाने द्यावे, असा ठराव मान्य झाला. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीला अध्यक्षपद दिले जावे, असा विचारही पुढे आला. डॉ. अरुणा ढेरे या सन्मानाने निवड झालेल्या पहिल्या संमेलनाध्यक्ष ठरल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले.
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ज्येष्ठ असावा की तरुण, याबाबत साहित्य क्षेत्रात अनेक मतमतांतरे आहेत. याबाबत लेखिका मंगला आठलेकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भाष्य केले होते. “साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा नेहमी वादाचा मुद्दा असतो. ज्येष्ठ साहित्यिकांविषयी माझ्या मनात पूर्ण आदर आहे. फक्त वयाने ज्येष्ठ नव्हे तर श्रेष्ठ कलानिर्मिती केलेल्या प्रत्येक साहित्यिकाचा जीवनगौरव देऊन सत्कार केला पाहिजे; पण वय वाढलेल्या प्रत्येक साहित्यिकाला संमेलनाध्यक्षाचे पद बहाल केलेच पाहिजे, हा आग्रह मला समजत नाही. उलट वयोवृद्ध साहित्यिकांनी आपण होऊन बाजूला व्हायला हवे. अशावेळी आपल्याला मिळू शकणारे अध्यक्षपद नाकारून मनस्वीपण लाभलेल्या तरुण लेखकांना ते त्यांनी आपण होऊन दिले पाहिजे,” अशी भूमिका घेऊन आठलेकर यांनी खळबळ माजवली होती.
वयोवृद्ध संमेलनाध्यक्ष
डॉ. जयंत नारळीकर - ८३ वर्षे, नाशिक
मधुकर हातकणंगलेकर - ८१ वर्षे, सांगली
विश्राम बेडेकर - ८० वर्षे, मुंबई