डॉ. जयंत नारळीकर यांचं जेष्ठत्व अन् श्रेष्ठत्व सर्वमान्य; आम्ही 'ती' काळजी नक्की घेऊ : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 12:55 PM2021-02-04T12:55:43+5:302021-02-04T15:26:11+5:30
साहित्य संमेलनासाठी कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल.
पुणे :ज्येष्ठ शास्रज्ञ व नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर यांचे ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व सर्वमान्य आहे. आज आम्ही त्यांना साहित्य संमेलनाचे आमंत्रण दिले.तसेच संमेलनाची रुपरेषा देखील समजावून सांगितली. नारळीकर हे २५ तारखेलाच नाशिकला पोहचतील. त्यांच्या सोयीनुसार संमेलनात सहभागी होतील. त्यांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पुण्यात छगन भुजबळ यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या राहत्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, भारतीय नागरिक म्हणून मी कलाकारांच्या मतांचा आदर करतो. भारतीय कलाकार सांगताहेत की हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. मग तुम्ही तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला. तुमच्या देशाचा प्रश्न आहे तर आधी तुम्ही बोलते व्हा. इतके दिवस शेतकरी रस्त्यावर, रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करत आहेत. त्यावर पण बोलायला पाहिजे असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद याबाबत चर्चाच आहे. पण याबाबत ज्यावेळी चर्चा थांबेल तेव्हाच खरे ते काय बाहेर येईल. कविता राऊत बाबत राज्यपाल म्हणाले ते योग्य आहे. राऊत यांना काही कागदपत्रांची पुर्तता करायची होती. ती त्या करतायत.
धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, मुंडे यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आलीय. पण या आधी देखील जी तक्रार देण्यात आली होती ती पुन्हा मागे घेण्यात आली. त्या महिलेच्या विरोधातच अनेकांनी तक्रारी दिल्या .
साहित्य संमेलनासाठी कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल. आम्ही त्यामधे ढवळाढवळ करणार नाही. शरद पवारांचा या संमेलनात सत्कार करण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता.
शरजील उस्मानीचे हिंदू समाजाबाबत वापरलेले शब्द चुकीचे होते. कारण आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतो. पण याचा अर्थ कोणाच्या भावना दुखावणे असा होत नाही.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या भेटीवर भुजबळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटु शकते. मुनगंटीवार भेटु शकतात, फडणवीस भेटू शकतात. मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का म्हणून असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.