डॉ. के. एच. संचेती यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी यशस्वी केली शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:48+5:302021-07-25T04:10:48+5:30

डॉ. संचेती यांनी ८५ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या जीवनातील शेवटची शस्त्रक्रिया केली. ऑपरेटिंग थिएटरमधून सेवानिवृत्त होणार झाले असले, तरी रूग्णसेवा ...

Dr. K. H. Sancheti underwent successful surgery at the age of 85 | डॉ. के. एच. संचेती यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी यशस्वी केली शस्त्रक्रिया

डॉ. के. एच. संचेती यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी यशस्वी केली शस्त्रक्रिया

Next

डॉ. संचेती यांनी ८५ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या जीवनातील शेवटची शस्त्रक्रिया केली. ऑपरेटिंग थिएटरमधून सेवानिवृत्त होणार झाले असले, तरी रूग्णसेवा आणि संचेती इन्स्टिट्यूट फॉर आर्थोपेडिक्स अ‍ॅन्ड रिहॅबिलिटेशनच्या नवीन अद्ययावत बांधकामामध्ये एक प्रेरकशक्ती म्हणून मार्गदर्शक असणार आहेत. डॉ. संचेती यांनी आतापर्यंत २०० हून अधिक हॉस्पिटल्सच्या डिझाईनसाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी संचेती रुग्णालय १९६५ मध्ये सुरू केले आणि आजही त्याच उत्साहाने ते दिवसरात्र कार्यरत आहेत. बी. जे. मेडिकल कॉलेजमधून १९५६ मध्ये वैद्यकीय शाखेची पदवी घेतल्यानंतर १ लाख चौरस फुटांच्या भव्य जागेत रुग्णालय बांधण्याची त्यांनी कल्पना धाडसी होती. मात्र त्यांची दूरदृष्टी ही अद्वितीय आहे. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. भविष्याचा अचूक वेध घेणारा एक दूरदृष्टीचे नेतृत्व आणि कोणत्याही परिस्थितीतून वाट काढणारा धडाडीचा वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द अतुलनीय ठरली आहे. आपल्या स्मितहास्याने आणि त्याच वेळी खंबीर निर्धारासह प्रत्येक अडथळ्यावर मात करत त्यांनी असंख्य मित्र आणि सहकारी जोडले. त्यांनी या सर्व माणसांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सोबतच्या नात्यांमधून विश्वासाची खरीखुरी संपत्ती उभी केली.

डॉ. संचेती यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि बीसी रॉय पुरस्कार आदी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक बुद्धिमान संशोधक आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी भारतात प्रथमच इंडस नी प्रोस्थेसिस ही गुडघ्यावरील अभिनव पध्दतीचा शोध लावला, ज्यामुळे असंख्य रुग्णांच्या गुडघे सांधेरोपणाद्वारे नवसंजीवनी मिळाली. इतकेच नव्हे तर रूग्ण हाच राजा असतो, असा विश्वास ठेवणाऱ्या डॉ. संचेती यांनी नंतर हिप प्रोस्थेसिस या प्रक्रियेचा शोध लावून असंख्य रुग्णांनाही दिलासा दिला. डॉ. संचेती यांनी आतापर्यंत ५५,००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या असून, २० लाखांहून अधिक रूग्णांवर उपचार केले आहेत. सुमारे ६०० शल्यचिकित्सकांना प्रशिक्षित केले आहे.

-------------------------

माझ्या जीवनाचे चार महत्त्वाचे स्तंभ म्हणजे निष्ठा, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि वचनबद्धता हे आहेत. अजूनही याच आधारे मी कार्यरत आहे. अजूनही ओपीडीमध्ये जाऊन मी रूग्णांची सेवा करणार असून फक्त शस्त्रक्रिया करणार नाही. प्रशासकीय कार्य व सध्या सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या निर्माण कार्यात सक्रिय राहणार आहे.

- डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ

---------------------

Web Title: Dr. K. H. Sancheti underwent successful surgery at the age of 85

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.