डॉ. कारभारी काळेंनी स्विकारली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 07:19 PM2022-05-18T19:19:12+5:302022-05-18T19:30:32+5:30
डॉ. नितीन करमळकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला...
पुणे : आज डॉ. कारभारी काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी बोलताना काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठ नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. आता कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर मनात उत्कट भावना असून, माझ्या कार्यकाळात विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉ. कारभारी काळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला. राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली नसल्याने नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे डॉ. काळे यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यानुसार डॉ. करमळकर यांनी काळे यांच्याकडे कुलगुरू पदाची सूत्रे सोपवली.