डॉ. कौस्तुभ राडकर यांचा आयर्नमॅन चॅम्पियनशिपमध्ये विक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:02+5:302021-09-11T04:12:02+5:30
डॉ. कौस्तुभ राडकर मूळचे पुण्याचे. कर्नाटक हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण, बीएमसीसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. ‘लोकमत’शी बोलताना ते ...
डॉ. कौस्तुभ राडकर मूळचे पुण्याचे. कर्नाटक हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण, बीएमसीसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘सातवी-आठवीपासून मी पोहायला सुरुवात केली. १९९५ मध्ये ४०० फ्रीस्टाईलमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन झालो. १९९५-२००० या कालावधीत दर वर्षी पोहण्याच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशीप मिळाली. त्यानंतर एशिया पॅसिफिक, साऊथ एशिया पॅसिफिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. २००१ मध्ये अमेरिकेतील विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली आणि मी अमेरिकेला गेलो. विद्यापीठामध्ये शिक्षण आणि पोहणे दोन्ही सुरुच होते. २००४ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर फिटनेस कायम राखण्यासाठी धावायला (रनिंग) सुरुवात केली. २००५-२००६ मध्ये अमेरिकेत मॅरेथॉनमध्ये धावण्याची खूप क्रेझ होती. स्वत:ला आव्हान देण्याच्या आणि पारखून पाहण्याच्या दृष्टीने २००६ साली मी न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये धावलो. २००७ मध्ये मला ‘आयर्नमॅन चॅम्पियनशिप’बद्दल समजले आणि त्यासाठी तयारी सुरु केली.’
राडकर यांनी रॅटस्ट्राँग कोचिंग नावाची अॅकॅडमी सुरु केली आहे. आयर्नमॅन आणि धावण्याच्या प्रशिक्षणासाठी त्यांच्याकडे जगभरातून प्रशिक्षणार्थी येतात. डॉ. राडकर यांचे ‘रिहॅबिलिटेशन’मध्ये स्पेशलायझेशन आहे. कोचिंगसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होत असताना २०१६ साली त्यांनी आपल्या पॅशनला पूर्ण वेळ देण्याचे ठरवले. आजवर त्यांनी १०० हून अधिक जणांना आयर्नमॅन चॅम्पियनशिपसाठी प्रशिक्षण दिले आहे.