डॉ. जयंत नारळीकर यांचा दुर्मिळ ठेवा एनएफएआयकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:21 AM2018-07-20T00:21:25+5:302018-07-20T00:21:54+5:30
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ‘आयुका’ या खगोलशास्त्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी वैयक्तिक जीवनातील काही महत्त्वाची ‘क्षणचित्रे’ टिपणाऱ्या फिल्म एनएफएआयकडे सुपूर्त केल्या आहेत.
पुणे : चित्रपटप्रेमी मंडळींकडून स्वत:कडे असलेल्या दुर्मिळ चित्रपटांचा संग्रह, पोस्टर किंवा चित्रपटाशी संबंधित ठेवा जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला ( एनएफएआय) दिला जातो. मात्र जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ‘आयुका’ या खगोलशास्त्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी वैयक्तिक जीवनातील काही महत्त्वाची ‘क्षणचित्रे’ टिपणाऱ्या फिल्म एनएफएआयकडे सुपूर्त केल्या आहेत. सुमारे आठ एमएम आणि सुपर आठ एमएमच्या स्वरूपातील या फिल्म एकूण चार तासांच्या कालावधीच्या आहेत.
डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकतीच भेट देऊन आपला हा अनमोल खजिना संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे स्वाधीन केला. डॉ. नारळीकर यांनी दिलेल्या सुमारे ४१ छोट्या फिल्ममध्ये प्रामुख्याने त्यांच्या अमेरिका, इंग्लंड आदी देशांच्या भेटी तसेच केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील वास्तवाचा काळ चित्रित करण्यात आला आहे. याशिवाय काही फिल्ममध्ये त्यांच्या कौटुंबिक जीवनातील महत्त्वाच्या कार्यक्रमांचा तसेच त्यांच्या तिन्ही मुलींच्या बालपणाच्या गमती-जमती आदी गोष्टींचा अंतर्भाव आहे. विशेष म्हणजे डॉ. नारळीकर व मंगला नारळीकर यांनीच या सर्व फिल्मचे चित्रीकरण केले आहे. या फिल्मचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे डॉ. जयंत नारळीकर यांच्या मातोश्री सुमती नारळीकर आणि वडील डॉ. विष्णू वासुदेव नारळीकर यांचेही काही दुर्मिळ क्षण चित्रित करण्यात आले
आहेत.
नारळीकरांचे वडील डॉ. विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. कालांतराने त्यांची राजस्थान लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. एका फिल्ममध्ये मातोश्री सुमती नारळीकर यांचे सतारवादन तसेच अजमेर शहराच्या बाहेर स्वत: मोटार ड्रायव्हिंग करत त्यांनी मारलेला फेरफटका याचे दर्शन घडते. तर दुसºया फिल्ममध्ये १९६६मध्ये पार पडलेला डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांचा विवाहसोहळा चित्रित केला आहे. काही फिल्ममध्ये नारळीकर कुटुंब राजस्थानात असताना त्यांच्या घरी झालेले हत्तीचे आगमन तसेच नारळीकर कुटुंबांच्या आग्रा, दिल्ली, अजमेर आणि मुंबई आदी शहरांतील भेटीदरम्यानचे काही महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळतात.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका खगोलशास्त्रज्ञाच्या वैयक्तिक जीवनातील फिल्मच्या स्वरूपातील क्षणचित्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध झाली आहेत याचा आनंद आहे.
- प्रकाश मगदूम, संचालक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय
माझ्या जीवनातील कौटुंबिक तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे प्रसंग चित्रित करण्यात आल्याने या फिल्मचे महत्त्व फार मोठे आहे.
- डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ