‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’साठी डॉ. सायरस पूनावाला यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:32+5:302021-07-31T04:10:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने यंदाच्या वर्षी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने यंदाच्या वर्षी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १३ आॅगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लशीची निर्मिती करून भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून संरक्षित केले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सीरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी लोकमान्यांच्या पुण्यतिथीदिनी दि. १ आॅगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते. यंदाचा समारंभ दि. १३ आॅगस्ट रोजी होणार आहे. या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून तर माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होईल.
‘सीरम’ची कार्यक्षमता आणि सक्षम वाटचालीच्या मागे डॉ. सायरस पूनावाला यांचे द्रष्टे नेतृत्व आहे. सर्वांसाठी आरोग्याचे ध्येय ठेवून डॉ. पूनावाला यांनी ‘सीरम’द्वारे प्रारंभापासूनच परवडणाऱ्या दरातील लशींची निर्मिती केली. यामध्ये त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड होऊ दिली नाही. यातूनच आज लसनिर्मितीच्या क्षेत्रात सीरम इन्स्टिट्यूट जगात अग्रस्थानी आहे, असे डॉ. टिळक यांनी नमूद केले.
----------------------------------------------------------------------------