सिमेंटचे जंगल उभारल्यास तापमानाचा चटका सोसावा लागेलच- डॉ. एम. रवीचंद्रन
By श्रीकिशन काळे | Published: April 25, 2023 02:27 PM2023-04-25T14:27:01+5:302023-04-25T14:29:12+5:30
कृषी महाविद्यालयातील नव्या इमारतीचे उद्घाटन...
पुणे : सध्या शहरात सिमेंटचे जंगल तयार होत आहे. त्यामुळे तापमान वाढणारच आहे. अर्बनायझेशनमुळे स्थानिक पातळीवर हवामान बदल होत आहे. त्याविषयी आम्ही अजून अभ्यास करत आहोत. उन्हात जर तीन तास तुम्ही उभे राहिलात. तर त्याचा तुमच्यावर परिणाम होणारच आहे. त्यासाठी तापमान खूप होते, हे कारण असू शकत नाही, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांनी दिली.
केंद्रीय कृषी हवामानशास्त्र निरीक्षण केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन कृषी महाविद्यालयात मंगळवारी सकाळी करण्यात आले. त्या वेळी रवीचंद्रन बोलत होते. या वेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने कार्यकारी संचालक डॉ. एम. मोहापात्रा, आयएमडी पुण्याचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर , टी. एस. मोहाडीकर, विश्वजीत सहाय आदी उपस्थित होते.
रवीचंद्रन म्हणाले,‘‘ शंभर वर्षांपासून आम्ही हवामानाचे निरीक्षण करत आहोत. निरीक्षणासाठी खूप यंत्रणेची गरज असते. त्यामध्ये अधिक गुंतवणूक व्हावी, अशी अपेक्षा आहे. कारण आता नवीन तंत्रज्ञान खूप येत आहे. त्यात गुतंवणूक झाल्यास आपल्याला हवामानाचा चांगला डाटा उपलब्ध होण्यास मदत होईल. हवामानाचा अंदाज कोणीही देऊ शकतो. परंतु, त्याची विश्वासार्हता किती असते. आम्ही शतकापासून अभ्यास करतोय. आमच्याकडे ती यंत्रणा आहे. त्यामुळे आम्ही त्यात विश्वासार्हता निर्माण केली आहे.
स्कायमेट आयएमडीच्या अगोदर हवामानाचा अंदाज देते. परंतु, ते किती दिवस अगोदर देतात? तर एक किंवा दोन दिवस अगोदर. त्यांचा हेतू वेगळा असू शकेल. पण विश्वासार्हता शेवटी आयएमडीवर ठेवावी लागेल, असे रवीचंद्रन म्हणाले.
आमचाही अंदाज चुकतो. आम्ही देखील १०० टक्के अचूक अंदाज देऊ शकत नाही. त्यामध्ये कमी जास्त होते. अधिकाधिक निरीक्षण करत राहणे, हेच अचूक अंदाजासाठी आवश्यक आहे. सध्या अनेकजण खासगी पातळीवर हवामानाचा अंदाज व्यक्त करतात. ते ॲस्ट्रॉलाजर आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा ? हा प्रश्नच आहे.
- डॉ. एम. रवीचंद्रन, सचिव, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय