डॉ. मोहरीर यांनी ज्ञानदानातून विद्यार्थी घडविले : चित्रा मोहरीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:43+5:302021-08-22T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. मोहरीर यांनी आचार्यांकडून संस्कृतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचेच संस्कार पुढे नेत ज्ञानदानातून त्यांनी अनेकानेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉ. मोहरीर यांनी आचार्यांकडून संस्कृतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचेच संस्कार पुढे नेत ज्ञानदानातून त्यांनी अनेकानेक विद्यार्थी घडविले. शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात असतानाही त्यांनी आपल्या वेदना बाजूला ठेवून डॉक्टरांच्या मुलाला संस्कृत शिकवत ज्ञानदानाचे कार्य केले, अशा शब्दांत चित्रा मोहरीर यांनी डॉ. मोहरीर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे संस्कृत दिनानिमित्त आयोजित डॉ. प्रा. ल. का. मोहरीर स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अभिजात माध्यमिक शाळेतील आठवी, नववीतील विद्याार्थ्यांचा डॉ. मोहरीर स्मृतिपुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी चैतन्य मोहरीर, वेदवती कुलकर्णी, पूर्वा म्हाळगी, अमला भागवत, सुप्रिया पालकर, सुनील वाटवे, क्षितिजा आगाशे, कमल कोठारी आदी उपस्थित होते.
डॉ. मोहरीर यांनी संस्कृत शिकविण्यासाठी तन, मन, धन ओतून काम केले. संस्कृत शिकण्यास उत्सुक असणाऱ्या कोणत्याही वयोगटाच्या आणि कोणतेही शिक्षण झालेल्या विद्याार्थ्यास त्याच्या वेळेनुसार शिकविण्याची डॉ. मोहरीर यांची तयारी असे. त्यामुळे पहाटे सहा वाजता तर दुपारी, रात्री संस्कृत शिकण्यामध्ये रस असणारे विद्यार्थी घरी येत असतं. संस्कृत विषयाशी संबंधित २१ पुस्तकांचे लेखन करणारे डॉ. मोहरीर यांनी आपण संस्कृतपंडित असल्याचा मोठेपणा कधी दाखवला नसल्याचे चित्रा मोहरीर यांनी सांगितले.
आयान सय्यद, अवंती भाकरे, चैतन्य ठोबळे, प्रेरणा गावडे या मुलांना डॉ. मोहरीर यांची पुस्तके, रोख रक्कम भेट देण्यात आली. मानसी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर संस्कृत विषय अध्यापिका मीनाक्षी यादव यांनी संस्कृतचे महत्त्व या वेळी विषद केले. ग. रा. पालकर शाळेच्या संचालिका अमला भागवत यांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. ज्योती आवटे-ओक यांनी सुश्री फाउंडेशनच्या वतीने आभार प्रदर्शन केले.
-------------