डॉ. न. म. जोशी, डॉ. अनिल अवचट यांना मसाप जीवनगौरव जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:11 IST2021-05-20T18:10:55+5:302021-05-20T18:11:35+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार' साहित्यिक डॉ. न. म. जोशी (२०२०) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे.

डॉ. न. म. जोशी, डॉ. अनिल अवचट यांना मसाप जीवनगौरव जाहीर
डॉ. सुनीलकुमार लवटे, मोहन रेडगावकर यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार' साहित्यिक डॉ. न. म. जोशी (२०२०) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे. वाड्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर (२०२०) आणि मोहन रेडगांवकर, इंदूर (२०२१) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, 'डॉ. न. म. जोशी आणि डॉ. अनिल अवचट यांना त्यांनी लेखनातून केलेल्या साहित्य सेवेबद्दल मसाप जीवनगौरव पुरस्कार तर डॉ. सुनीलकुमार लवटे आणि मोहन रेडगांवकर यांनी वाचन आणि साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी असलेल्या संपूर्ण टाळेबंदीमुळे परिषदेचा वर्धापनदिन जाहीरपणे साजरा होऊ शकला नाही. फक्त पदाधिकाऱ्यांनी यादिवशी दीपप्रज्वलन केले. यावर्षीही जाहीर कार्यक्रम करणे शक्य नाही. मसाप जीवनगौरव आणि डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार हे मसापचे दोन महत्त्वाचे पुरस्कार असून यावर्षी वर्धापन दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
गेल्या वर्षी आणि यावर्षी टाळेबंदीमुळे ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांसाठी अनेक प्रकाशकांना आणि लेखकांना त्यांची पुस्तके पाठविता आली नाहीत. तसेच करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परीक्षकांची समिती नियुक्त करणे, त्यांच्या बैठका होऊन त्यांनी पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करणे ही प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही. त्यामुळे करोना संसर्ग कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची तसेच उत्कृष्ट शाखा व कार्यकर्ता पुरस्कारसाठीची प्रक्रिया पार पाडून पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल. सर्व पुरस्कार परिस्थिती अनुकूल असल्यास समारंभपूर्वक देण्यात येतील अन्यथा पोस्टाद्वारे ते घरपोच पाठविण्यात येतील.