डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; कायदयाला धरून आरोपींची ओळख परेडच घेतलेली नाही; बचाव पक्षाचा युक्तिवाद
By नम्रता फडणीस | Published: March 12, 2024 08:37 PM2024-03-12T20:37:38+5:302024-03-12T20:38:13+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू
पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा तपास करताना कायदयाला धरून ओळख परेड घ्यायला हवी. परंतु ती घेण्यात आलेली नाही. कारण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) हे माहिती होतं की विशेष न्यायाधीशांसमोर ओळख परेड घ्यायची झाली तर साक्षीदार आरोपींना ओळखू शकणार नाहीत. त्यामुळे काहीतरी कागद दाखल करायचा म्हणून सादर केला आहे. यात ओळख परेड न करता त्यांनी साक्षीदाराकडून फक्त छायाचित्रे ओळखून घेतली. पण ती छायाचित्रेही साक्षीदाराने नीट ओळखली नाहीत असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी (दि. ११) केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये बचाव पक्षातर्फे ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अंतिम युक्तिवाद केला.आरोपींनी घटनास्थळ, ते कुठून आले?, कुठून गेले? हे दाखविले असल्याचे सीबीआय म्हणते. पण त्यांचे म्हणणे धादांत खोटे व रचलेले आहे. या प्रकरणात सीबीआयने दोन साक्षीदार तपासले. आरोपींची छायाचित्रे साक्षीदारांनी सीबीआयच्या कार्यालयात ओळखली असे सांगण्यात आले. पण तेही खोटे आहे. साक्षीदाराचे उलट म्हणणे आहे की बरेच दिवस झाले. मला आता आठवत नाही, अंतरही बरेच होते. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकत नाही. यातही फक्त कळसकर चा फोटो दाखविला, अंदुरेचा दाखविलाच नाही. मग दोघांचे फोटो ओळखले असे कसे म्हणता येईल? साक्षीदाराने कोर्टात सांगितले की मी सीबीआयला हेच म्हणालो की ते तसेच दिसतात पण हे तेच आहेत असे म्हणालो नाही. तसेच दिसतात आणि तेच आहेत यात फरक आहे. त्यामुळे हा सर्व बनाव रचलेला असल्याचा दावा बचाव पक्षाने केला. तसेच सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर त्याची एका कागदावर सही घेण्यात आली. त्यानंतर कागदावर हवे ते लिहिण्यात आले आहे.अशाच प्रकारे शरद कळसकर याचाही पंचनामा करण्यात आला आहे. हे दोन्ही पंचनामे शेजारी ठेवून पाहिले तर एकच फाईल आहे फक्त नावे बदलली आहेत असे दिसते. हे असे कसे ? असा सवालही बचाव पक्षाने केला. दरम्यान, उद्याही (दि. १२) सकाळी बचाव पक्षाचा युक्तिवाद होणार आहे.