Dr.Narendra Dabholkar Murder Case : ‘सनातन’शी संबंधित ५ जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:51 PM2021-09-07T14:51:41+5:302021-09-07T19:18:54+5:30

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यासाठी १५ सप्टेंबरला सुनावणी

Dr. Narendra Dabholkar Murder Case : Big update in Narendra Dabholkar murder case; The courtrelief to the accused | Dr.Narendra Dabholkar Murder Case : ‘सनातन’शी संबंधित ५ जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

Dr.Narendra Dabholkar Murder Case : ‘सनातन’शी संबंधित ५ जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी ८ वर्ष पूर्ण झाली. मात्र, अद्यापही या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर एक न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यास मुदत देण्याची विनंती केली असून न्यायालयाने ती मान्य केली आहे. तसेच दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींवर १५ सप्टेंबरला दोषारोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

गुन्हा मान्य आहे का? अशी विचारणा न्यायालयाने आरोपींना केली. मात्र कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळण्याची विनंती सचिन अंदुरे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी केले. पाच आरोपींपैकी एक आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने दोन आरोपींनी केलेली मुदतवाढीची विनंती मान्य करीत न्यायालयाने १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित केला जाईल, असे सांगितले. मात्र, आरोपींना आणखी मुदत वाढ देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील  डॉ. वीरेंद्र्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर मंगळवारी (दि. ७) दोषारोप निश्चिती करण्यात येणार होते. त्यासाठी अंदुरे, डॉ. तावडे, अ‍ॅड. पुनाळेकर हे व्हिडीओ कॉन्स्फरन्सद्वारे उपस्थित होते. भावे स्वत: हजर होता. तर कळसकर तांत्रिक अडचणींमुळे हजर राहू शकला नाही.  न्यायालय वारंवार आरोपीना गुन्हा मान्य आहे का? अशी विचारणा करीत होते. आजच गुन्हा निश्चिती व्हायला हवी असे न्यायालय वारंवार सांगत होते. परंतु,  कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळण्याची विनंती अंदुरे आणि डॉ. तावडे यांनी केली. आरोपींना त्यांच्या नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधण्याचे नियोजन करून देण्यात येईल. याप्रकारची न्यायालय ऑर्डरही काढेल. मात्र एक आठ्वड्यानंतर पुन्हा तारीख दिली जाणार नाही. केस लवकर चालवावी लागेल असे सांगत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनीच आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांना कोणती तारीख देऊ, अशी विचारणा केली. त्यावर 15 सप्टेंबरवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सीबीआयच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी कामकाज पाहत आहेत.

या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत. तर अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून अँड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------
अ‍ॅड. पुनाळेकर यांच्यावर केवळ पुरावा नष्ट केल्याचा आरोप 
अ‍ॅड. पुनाळेकर यांच्यावर या प्रकरणात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा २०१३ मध्ये घडला आहे. तेव्हा अँड. पुनाळेकर यांचे नाव या गुन्ह्यात नव्हते, असे नमूद करीत न्यायालयाने केवळ पुरावा नष्ट केल्याच्या आरोपानुसार अँड. पुनाळेकर यांच्याविरोधात आरोपी निश्चित करण्याचे आदेश दिले.
------------------------------------------------------------------------
दोन्हीकडे कसा अर्ज करता येईल? न्यायालयाचा सवाल
डॉ. तावडे यांनी या गुन्ह्यात जामिनासाठी सत्र आणि उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. सत्र न्यायालयातील अर्ज हा अंतिम सुनावणीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे त्यावर सुनावणी घेण्याची मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली.मात्र सत्र आणि उच्च अशा दोन्ही न्यायालयात एकाच वेळी जामिनासाठी अर्ज कसा करता येईल? असा सवाल न्यायालयाने केला.

Web Title: Dr. Narendra Dabholkar Murder Case : Big update in Narendra Dabholkar murder case; The courtrelief to the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.