डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण, खऱ्या सूत्रधारांपर्यंत कधी पोहोचणार- अंनिसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 08:19 AM2018-08-20T08:19:51+5:302018-08-20T10:37:07+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र त्यांच्या हत्येमागील सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात अंनिसच्या जवाब दो रॅली काढण्यात आली आहे.
पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत या हत्येमागील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली, त्याच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून आज सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे आदी सहभागी झाले होते. त्याचबरोबर तरुणांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.
'जवाब दो, जवाब दो, मोदी सरकार जवाब दो', 'विवेकाचा आवाज बुलंद करूया', 'फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. डॉ. दाभोलकरांचे छायाचित्र तसेच घोषणांचे फलक यावेळी हातात धरण्यात आले होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून रॅली लक्ष्मी रस्ता, अलका चौक, शास्त्री रस्त्याने रॅली सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे आली.
सकाळी शिंदे पुलावर जोशपूर्ण गीतांमधून दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. आज दिवसभर साने गुरुजी स्मारक येथे विवेकवादी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे चर्चासत्र होणार असून त्यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी सहभागी होणार आहेत. अभिनेते प्रकाश राज,जेष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर हेही चर्चा सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.
(अंदुरे-तावडेने रचला कट; सीबीआयचा कोर्टात दावा)
दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी केला. हत्येचा सखोल तपास करून सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अंदुरेला कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी त्याला 26 आॅगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नालासोपारा येथे स्फोटके जप्त केल्यानंतर वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरेला शनिवारी अटक केली होती. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. विजयकुमार ढाकणे युक्तीवादात म्हणाले, दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या अंदुरेला पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण कोणी दिले? हत्येसाठी आवश्यक बाबी त्याला कोणी पुरविल्या? हत्येसाठी वापरलेले वाहन व शस्त्र जप्त करण्यासाठी व सखोल तपासासाठी त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्यात यावी.
अंदुरेने झाडली तिसरी गोळी?
अंदुरे मोटारसायकल चालवित होता, त्याचा साथीदार पाठीमागे बसला होता. साथीदाराने डॉ. दाभोलकरांवर दोन गोळ्या झाडल्या तर तिसरी गोळी अंदुरेने झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींकडे पिस्तुल होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.