डॉ. दाभोलकर खून प्रकरण; एस.आर सिंग यांची उलटतपासणी पूर्ण
By नम्रता फडणीस | Published: September 5, 2023 08:21 PM2023-09-05T20:21:32+5:302023-09-05T20:21:52+5:30
येत्या 13 सप्टेंबरला सीबीआय तपासाबाबत अंतिम अहवाल न्यायालयात सादर करणार
पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी बचाव पक्षाच्या वतीने सीबीआयचे तत्कालीन अधिकारी एस.आर सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. येत्या 13 सप्टेंबरला आणखी काही साक्षीदार घेतले जाणार आहेत की नाही हे सीबीआय न्यायालयाला सांगणार असून, आत्तापर्यंत कशा पद्धतीने तपास करण्यात आला याचा अंतिम अहवाल सीबीआयकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे, अशी माहिती सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अँड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 आॅगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील, सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची विशेष न्यायाधीश पी.पी जाधव यांच्या न्यायालयात सुरु होती. बचाव पक्षाच्या वतीने सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. अँड सुवर्णा वस्त यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. आत्तापर्यंत या प्रकरणात सीबीआयच्या वतीने 20 साक्षीदार सादर करण्यात आले. त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली. यामध्ये किरण केशव कांबळे आणि विनय केळकर या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससूनच्या पोस्ट मार्टम विभागाचे डॉ. अजय तावरे, फिर्यादी नवनाथ रानगट, संजय साडविलकर, सोमनाथ धायडे आणि एस.आर सिंग यांची साक्ष नोंदविण्यात आली. सीबीआयने निश्चित केलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. आता अजून काही साक्षीदार न्यायालयात सादर करायचे असल्यास सीबीआयला त्याची यादी न्यायालयात सादर करावी लागणार आहे. आणखी काही साक्षीदार घेणार आहे का? घेणार असेल तर त्याविषयीची यादी सीबीआय न्यायालयात दि.13 सप्टेंबरला सादर करणार आहे.
दाभोलकर कुटुंबियांच्या दबावाखाली निरपराध लोकांना अटक केली का? किंवा राजकीय आणि सोशल मीडियाच्या दबावाखाली होतात का? केवळ दाखविण्याच्या उद्देशाने खोटे रेकॉर्ड तयार केले का? असे बचाव पक्षाच्या वतीने अँड सुवर्णा वस्त यांनी एस.आर सिंग यांना विचारले असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.