डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : पुनाळेकर आणि भावेला आज न्यायालयात करणार हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 11:58 AM2019-06-01T11:58:50+5:302019-06-01T12:00:17+5:30
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सीबीआय कोठडी आज संपत असून त्यांना दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाईल.
पुणे : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सीबीआय कोठडी आज संपत असून त्यांना दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाईल.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता पुणे सत्र न्यायालयाने 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई हायकोर्टाचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली होती.
संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.
सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला होता. यापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी बेंगलोर येथील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने दाभोलकर यांचेवर गोळ्या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अंदुरे यास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला होता.