डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला : रुग्णवाहिकेमध्ये ठेवताना पाहिल्यावर डॉ. दाभोलकर असल्याचे समजले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 08:58 AM2023-03-17T08:58:25+5:302023-03-17T09:00:55+5:30

जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असताना त्यांचा चेहरा दिसला तेव्हा ते डॉ. दाभोलकर असल्याचे समजले, अशी साक्ष...

Dr narendra Dabholkar murder case understood Dabholkar when body in ambulance suresh kenjale | डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला : रुग्णवाहिकेमध्ये ठेवताना पाहिल्यावर डॉ. दाभोलकर असल्याचे समजले

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला : रुग्णवाहिकेमध्ये ठेवताना पाहिल्यावर डॉ. दाभोलकर असल्याचे समजले

googlenewsNext

पुणे : सकाळी घरी असताना पावणेआठ वाजता डेक्कन ठाणे अंमलदाराचा फोन आल्यावर ओंकारेश्वर पुलावर गोळीबार झाला असून, एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती मला मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी दोन जिवंत, दोन मोकळी काडतुसे, फुटका चष्मा, चप्पल आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ती दिसली. जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असताना त्यांचा चेहरा दिसला तेव्हा ते डॉ. दाभोलकर असल्याचे समजले, अशी साक्ष डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश केंजळे यांनी नोंदवली असल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचजणांवर आरोप निश्चिती करण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरेश केंजळे यांची साक्ष ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी नोंदवली.

ओंकारेश्वर पुलावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचा घटनाक्रम सुरेश केंजळे यांनी न्यायालयात सांगितला. जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असताना त्यांचा चेहरा दिसला, तेव्हा ते डॉ. दाभोलकर असल्याचे समजले. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जोशी आले. जोशी यांनी रानगट यांची एफआयआर घेण्यास मला सांगितले. त्यानुसार डेक्कन पोलिस ठाण्यात येऊन एफआयआर घेतल्यानंतर कलमांची माहिती फोनवरून जोशी यांना कळवली. दुपारी ससून रुग्णालयात गेलेल्या हवालदाराने ससून रुग्णालयातून आणलेल्या २१ वस्तू माझ्यासमोर हजर केल्या. दोन पंच बोलवून त्याचा पंचनामा केला. त्यानंतर तो पंचनामा आणि एफआयआर जोशी यांच्याकडे दिल्या, असे केंजळे यांनी साक्षीदरम्यान सांगितले.

यावेळी बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी केंजळे यांची उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर यांचा मृत्यू कधी झाला याची माहिती कधी मिळाली, असे विचारले असता केंजळे यांनी १२ वाजता असे सांगितले. त्यावेळी जर १२ वाजता डॉ. दाभोलकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर मग एफआयआरमध्ये सकाळी साडेनऊ वाजता ३०२ हे कलम लावल्याची बाब ॲड. साळशिंगीकर यांनी निदर्शनास आणून दिली. डॉ. दाभोलकर यांना सर्वप्रथम पाहणाऱ्या पोलिस निरीक्षकाला गोळ्यांचा आवाज ऐकल्याबाबत प्रश्न विचारला का? त्यावर केंजळे यांनी 'नाही' असे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज (दि. १७) होणार आहे.

Web Title: Dr narendra Dabholkar murder case understood Dabholkar when body in ambulance suresh kenjale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.