डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटला: साक्षीदाराने अंदुरेला ओळखल्याचे खोटे सांगितले; बचाव पक्षाचा न्यायालयात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:45 AM2024-03-27T09:45:00+5:302024-03-27T09:45:42+5:30
धायडेला पोलिसांनी धमकावून आणले आणि त्याने हिंदू जनजागृती सभेमध्ये सचिन अंदुरेला ओळखले हे खोटे सांगितले असल्याचा दावा बचाव पक्षाने केला...
पुणे : सोमनाथ धायडे याने औरंगाबाद येथील गजानन मंदिरासमोर गारखेडा भागात हिंदू जनजागरण समितीची बैठक झाली आणि तिथे सचिन अंदुरे याची भेट झाल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. बचाव पक्षाने कडा येथे बैठक झाल्यासंदर्भातली कागदपत्रे जलसंपदा खात्याकडून माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली. परंतु, गारखेडा आणि कडा एकच आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. धायडेला पोलिसांनी धमकावून आणले आणि त्याने हिंदू जनजागृती सभेमध्ये सचिन अंदुरेला ओळखले हे खोटे सांगितले असल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी (दि. २६) बचाव पक्षाचे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर व सुवर्णा आव्हाड यांनी अंतिम युक्तिवाद केला. बचाव पक्षाने सीबीआयच्या तपासातील विरोधाभास दाखविण्याचा प्रयत्न केला. शरद कळसकर याने जिथे पिस्तूल टाकले ते मिळाले नाही. पण, सीबीआय त्याला निर्दोष मानत नाही. बेकायदा शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ज्यांच्याकडे पिस्तूल मिळाले आहे. त्यांनीच गोळ्या मारल्या आहेत, असे गृहीत धरले जाते. मात्र, ज्याच्याकडे पिस्तूल मिळाले नाही त्याला दोषी ठरवा आणि ज्यांच्याकडे पिस्तूल मिळाले त्यांना सोडा म्हणतात हे का? असा सवाल बचाव पक्षाने उपस्थित केला.
तसेच, साक्षीदार विनय केळकर एकाच वेळी तीन गोष्टी सांगतात. एकदा म्हणतात मी बाल्कनीमधून बघितले, की दोन माणसे पळत येत होती आणि एक व्यक्ती जमिनीवर पडला. दुसऱ्या वेळेला सांगतात, की दोघांनी गोळ्या झाडल्या आणि तिसऱ्या गोष्टीत पांढरी टोपी घातलेल्याने गोळ्या झाडल्या. यातले खरे काय? याशिवाय दुसरा साक्षीदार कांबळे न्यायालयात सांगतो, की अंदुरेने हे केले नाही. मग दुसऱ्यांदा अंदुरेला न्यायालयात कसे ओळखतो, याकडे ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. दरम्यान, दोघेही टोप्या घालून होते तर साक्षीदार विनय केळकर यांना दोनशे मीटरवरून ते कसे काय दिसले, असा युक्तिवाद ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी केला. उद्याही (दि २७) बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद सुरूच राहणार असून, ॲड. सुवर्णा आव्हाड बाजू मांडणार आहेत.