डॉ. न. म. जोशी, डॉ. अनिल अवचट यांना ‘मसाप जीवनगौरव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:01+5:302021-05-21T04:11:01+5:30
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ''मसाप जीवनगौरव पुरस्कार'' साहित्यिक डॉ. न. म. जोशी (२०२०) आणि डॉ. ...
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ''मसाप जीवनगौरव पुरस्कार'' साहित्यिक डॉ. न. म. जोशी (२०२०) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे. वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर (२०२०) आणि मोहन रेडगावकर, इंदूर (२०२१) यांना जाहीर झाला. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुरस्कार जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, ''डॉ. न. म. जोशी आणि डॉ. अनिल अवचट यांना त्यांनी लेखनातून केलेल्या साहित्य सेवेबद्दल मसाप जीवनगौरव पुरस्कार, तर डॉ. सुनीलकुमार लवटे आणि मोहन रेडगावकर यांनी वाचन आणि साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही वर्धापनदिनी जाहीर कार्यक्रम करणे शक्य नाही. मसाप जीवनगौरव आणि डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार हे मसापचे दोन महत्त्वाचे पुरस्कार असून, यावर्षी वर्धापन दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
गेल्या वर्षी आणि यावर्षी टाळेबंदीमुळे ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांसाठी अनेक प्रकाशकांना आणि लेखकांना त्यांची पुस्तके पाठविता आली नाहीत. तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परीक्षकांची समिती नियुक्त करणे, त्यांच्या बैठका होऊन त्यांनी पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करणे ही प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची तसेच उत्कृष्ट शाखा व कार्यकर्ता पुरस्कारसाठीची प्रक्रिया पार पाडून पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल. सर्व पुरस्कार परिस्थिती अनुकूल असल्यास समारंभपूर्वक देण्यात येतील अन्यथा पोस्टाद्वारे ते घरपोच पाठविण्यात येतील. याची लेखक, प्रकाशक आणि देणगीदारांनी नोंद घ्यावी, असे प्रा. जोशी यांनी स्पष्ट केले.