डॉ. पी. डी. पाटील यांना गदिमा जन्मशताब्दी सन्मान’, उल्हास पवार यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:10+5:302021-01-13T04:23:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गीतरामायण अजरामर करणारे ग. दि. माडगूळकर यांच्या 101 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने आयोजित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गीतरामायण अजरामर करणारे ग. दि. माडगूळकर यांच्या 101 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘गदिमा काव्य, साहित्य, सांस्कृतिक महोत्सवात ‘गदिमा जन्मशताब्दी सन्मान’ पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर महोत्सवात माजी आमदार उल्हास पवार यांना ‘गदिमा जीवनगौरव पुरस्कार’, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना ‘मृत्युंजय साहित्य पुरस्कार’, नांदेड येथील जगदीश कदम यांना ‘गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार’ व ‘लोककला पुरस्कार’ लोककलावंत वैशाली काळे-नगरकर यांना देण्यात येणार आहे
हा महोत्सव रविवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता गदिमांच्या सांगली जिल्ह्यातील माडगुळे गावातील गदिमा पार येथे आयोजिला आहे. महोत्सवात विविध सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण व त्यानंतर माणदेशातील निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार असल्याची माहिती संयोजकांनी कळविली आहे.
या महोत्सवाचे उदघाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, नारायण सुर्वे कला अकादमीचे सुदाम भोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘गदिमा संस्कारक्षम शाळा सन्मान’ आटपाडी एज्युकेशन सोसायटी (आटपाडी), ग.दि. माडगूळकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (माडगुळे) आणि नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज (नाझरा, ता.सांगोला) यांना देण्यात येणार आहे. ‘कृषिभूषण पुरस्कार’ पांडुरंग लाडे आणि ‘माणगंगा भूषण पुरस्कार’ वैजीनाथ धोंगडे यांना दिला जाणार आहे. साहेबराव ठाणगे, विनायक पवार, देवा झिंझाड आणि श्रीनिवास मस्के यांना गदिमा पुरस्कार देण्यात येणार आहे. या सांस्कृतिक सोहळ्यात गदिमांच्या तीन पिढ्या नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, नात लीनता आंबेकर, पणती पलोमा माडगूळकर, पुतणे मुक्तेश्वर माडगूळकर सहभागी होणार आहेत.
------------------