डॉ. प्रभा अत्रे : महान गायिका, गुरू आणि बरंच काही..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:13 AM2021-09-11T04:13:50+5:302021-09-11T04:13:50+5:30
स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे या १३ सप्टेंबर २०२१ रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने .... गेली ...
स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे या १३ सप्टेंबर २०२१ रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने ....
गेली चाळीस वर्षे डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन ऐकत आले आहे. सुरुवातीला ‘फॅन’ म्हणून त्यांच्या बंदिशी ओळख नसतानाही गायले आहे. आता शिष्या होण्याच्या प्रवासात प्रभाताईंचं गायन इतकं का आवडतं? याचा विचार करता, ’हे गायन बुद्धिप्रधान आहे... केवळ पठडीतलं गायन नव्हेच..., शास्त्राच्या सर्व चौकटींचे पालन करूनदेखील कलेचा आविष्कार पुरेपूर जाणून देणारे असे हे गायन आहे ’ हे प्रकर्षाने जाणवते.
जाणकार श्रोत्यांच्या मनोभूमिकेतून विचार केला तर प्रभाताईंच्या गायनात अपेक्षित-अनपेक्षितता (predictably unpredictable) असते ! त्यांचा एखादा राग ऐकल्यानंतर तोच राग दुसऱ्या एखाद्या मैफलीत पुन्हा ऐकताना लक्षात येतं की, मागच्या वेळेपेक्षा आता काहीतरी नवीनच ऐकायला मिळतं आहे, ते देखील रागाच्या, शास्त्राच्या संपूर्ण चौकटीत राहूनच.
’जाणकार श्रोते’ निर्माण व्हावेत यासाठी प्रभाताईंनी वारंवार प्रयत्न केले. ’स्वरमयी गुरुकुल’ येथे दर महिन्याला होणाऱ्या मैफलीनंतर श्रोत्यांनी कलाकारांना प्रश्न विचारावेत. आपल्या ज्ञानात भर घालून घ्यावी असा त्यांचा विशेष आग्रह असतो. श्रोते जाणकार झाले तर कलाकारालाही मैफल सादर करताना विशेष आनंद होतो, असे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी ’एनलायटनिंग दि लिसनर’ हे इंग्रजी पुस्तक लिहिलेले आहे.
कलाकार, संगीत शिक्षणविषयक लेखन, संगीत रचनाकार, कवी अशा अनेकविध भूमिका करणाऱ्या दुर्मिळ कलाकारांपैकी त्या एक आहेत. स्वत: उत्तम काव्यरचना करत असल्यामुळे बंदिशींची रचना गायनासाठी योग्य असाव्यात, विस्तारक्षम जागा असावी, रागस्वरूप उत्तम रीतीने दिसत असतानाच त्या बोजड होऊ नयेत याबद्दलची काळजी जाणवते.
प्रभाताईंनी पाश्चिमात्य संगीताचाही अभ्यास केला आहे. त्यांच्याच बंदिशीचे त्यांच्यासमोर सादरीकरण करताना आम्ही भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चात्य संगीत यांचे एकत्र स्वररूप सादर केले. ८० च्या दशकात, त्या एस. एन. डी. टी. महाविद्यालयात संगीत विभागप्रमुख होत्या तेव्हा त्यांनी संगीत विषयाचा अभ्यासक्रम बदलून त्यात अनेक ज्ञान शाखांचा आणि विषयांचा समावेश केला होता.
गुरू प्रत्यक्ष जे सांगतात यातून आपण जे शिकतो त्यापेक्षा बरंच काही आपण गुरूंच्या निरीक्षणातून शिकतो. प्रभाताई गात असतात तेव्हा तर मैफल सादर कशी करावी याची आम्हा शिष्यांसाठी शिकवणीच असते. शिष्याने जर एखादा विशिष्ट राग शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली तर पुढच्या वेळी त्या त्या रागातील बंदिशींसह शिष्याची वाट पाहतात. मी स्वत: याचा अनुभव घेतलेला आहे.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी सर्व शिष्यांचे गायनाचे सादरीकरण त्या सलग बारा तास एका ठिकाणी बसून ऐकतात. त्यांच्यासमोर गाणे ही शिष्यांसाठी एक पर्वणी परंतु परीक्षाच असते.प्रभाताईंना जेव्हा ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अत्यंत उत्साहाने साजरा झाला. प्रभाताईंना ९० वर्षे पूर्ण होण्याच्या संपूर्ण वर्षभरात अनेक कार्यक्रम करण्याचे मनात आहे, परंतु सध्या तरी कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होण्याचीच वाट पाहावी लागणार आहे. प्रभाताईंचा ९० वर्षपूर्तीचा सोहळा अगदी आमच्या मनासारखा पार पडण्यासारखी परिस्थिती निर्माण होवो, हीच प्रार्थना !
- (लेखिका गायिका व डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत)