डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्येतीत सुधारणा, सर्व टेस्टनंतर होणार कर्करोगावर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:29 PM2022-06-18T12:29:49+5:302022-06-18T12:31:45+5:30
पुढील महिनाभर होणार उपचार
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) हे सध्या पुण्यातील दिनानाथ मंंगेशकर रुग्णालयात न्युमोनियावर उपचार घेत आहेत. सध्या त्यांची तब्येत बरी आहे. आज कदाचित डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन तीन दिवसांनी रुग्णालयात चेक होईल. त्यानंतर सर्व टेस्ट करून किमो थेरपी करण्यात येईल अशी माहिती डॉ. आमटेंचा मुलगा अनिकेत आमटे यांनी दिली आहे.
नंतर साधारण महिनाभर पुण्यातील रुग्णालयातच ट्रीटमेंट होणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना रक्ताच्या कर्करोगाचे ( हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर) निदान झाले आहे. सध्या ते न्युमोनियातून सावरत असून कर्करोगावरील उपचार लवकरच सुरू होतील असं त्यांचा मुलगा अनिकेत यांनी सांगितले.
डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.