डॉ. अनिल रामोडेंच्या मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना राधाकृष्ण विखे -पाटलांचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 09:15 PM2023-06-25T21:15:42+5:302023-06-25T21:15:51+5:30
अंबदास दानवे यांच्याकडून पत्र ट्विट करत निशाणा
पुणे - विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना लाच घेतल्याप्रकरणी अटकेत आहेत. डॉ. रामोडे यांची पुणे विभागातून बदली करू नये, यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस पत्र लिहिले होते. हे पत्र ट्वीट करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विखे पाटलांवर टीका केली आहे.
दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा आठ लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे नाव समोर आले आहे. त्या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते.
१ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते, रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.
काय म्हटले होते पत्रात
डॉ. अनिल रामोड (भाप्रसे), अतिरिक्त विभागीय आयुक्त हे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आक्टोबर २०२० पासून कार्यरत आहेत. त्यांची मुले पुणे येथे पदव्यूत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. त्यांनी मुलांचे शैक्षणिक सोयीचे दृष्टीने सध्याचे ठिकाणी एक वर्ष मुदतवाढ मिळकत विनंती केलेली आहे.
कृपया, डॉ. अनिल रामोड यांना विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे एक वर्ष मुदतवाढ देणेबाबत नियमोचित कार्यवाहीसाठी संबंधितांना आदेश व्हावेत ही विनंती.