राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा दीक्षित यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:05 PM2021-05-27T21:05:45+5:302021-05-27T21:26:01+5:30
विश्वकोशाच्या माध्यमातून ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर भर असेल : डॉ. राजा दीक्षित
पुणे : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. राजा दीक्षित यांची राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
डाॅ. राजा दीक्षित हे इतिहासाचे गाढे अभ्यासक असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. ',दोन वर्षांपूर्वी रा.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने मला वाई येथे सन्मानित करण्यात आले होते. नुकतीच वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या नवभारत मासिकाचे संपादकपदही स्वीकारले आहे. आता विश्वकोशाच्या निमित्ताने वाईशी जुळलेले ऋणानुबंध वृद्धिंगत झाले आहेत', अशा भावना डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केल्या.
ते म्हणाले, 'विश्वकोश आणि ज्ञानकोश ही ज्ञानाच्या लोकशाहीकरणाची साधने आहेत. त्यांचे सामाजिक पातळीवरील महत्त्व निरंतर आहे. विश्वकोशाला खूप प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे. तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी, मे. पु. रेगे, प्रा. रा. ग. जाधव यांच्यासारख्या विद्वानांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. तिघांविषयी मला नितांत आदर आहे. २७ मे हा तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी यांचा स्मृतीदिन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वर्धापनदिन. साहित्य परिषदेत दीपप्रजवलनासाठी गेलो असताना म.श्री.दीक्षित पायरीचे दर्शन घेऊन आलो आणि जणू वडिलांचे आशीर्वादही मिळाले, हा विलक्षण योगायोग आहे.'
-----
विश्वकोश, ज्ञानकोश ही अभ्याससाधने आहेत. त्यांना कधीच पूर्णविराम नसतो. विश्वकोश ही प्रवाही प्रक्रिया आहे. विश्वकोषाचे २० खंड प्रकाशित झाले असले तरी जुन्या नोंदींची फेररचना, काळाच्या ओघात कराव्या लागणाऱ्या दुरुस्ती, नव्या नोंदींची भर हे काम अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. नवतंत्रज्ञान, जागतिकीकरणाच्या युगात विश्वकोषामध्ये नव्या युगाचा संदर्भ महत्वाचा असतो. अभ्यास साधनांचे सामाजिक संदर्भातील मूल्य मोठे असते. आजवर ज्ञानापासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत विश्वकोश पोहोचावा, यासाठी प्रयत्न करेन.
- डॉ. राजा दीक्षित, अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ