राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:37+5:302021-01-20T04:11:37+5:30
पुणे : शासनाने राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या पुनर्रचनेचा घाट न घालता पुढील नियुक्ती होईपर्यंत मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत ...
पुणे : शासनाने राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या पुनर्रचनेचा घाट न घालता पुढील नियुक्ती होईपर्यंत मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनाच कायम ठेवले आहे. काही महिन्यांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या डॉ. मोरे यांनीही या पदाचा स्वीकार केला आहे.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात डॉ. मोरे यांची डिसेंबर, २०१८ मध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंडळे आणि समित्या बरखास्त केल्या जातात. महाआघाडी सरकार आल्यानंतर डॉ.मोरे यांनी मंडळाचा राजीनामा दिला होता, परंतु शासनाने डॉ.मोरे यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. पुनर्रचना रखडल्यामुळे मंडळांकडून कार्यान्वित केले जाणारे विविध उपक्रम रखडले. दरम्यान, विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य व संस्कृती मंडळाची पुनर्रचना करू, असे तीन महिन्यांपूर्वी मराठी भाषामंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. आता शासनाने डॉ.मोरे यांनाच कायम ठेवले आहे. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे.
--
मी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शासनाने तो स्वीकारला नाही. याचा अर्थ, त्यांना माझे काम योग्य वाटले असेल. त्यामुळे मी आता पूर्ववत काम सुरू करेन.
- डॉ.सदानंद मोरे, ज्येष्ठ विचारवंत