डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार; आदित्य ठाकरेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 04:17 PM2022-02-13T16:17:08+5:302022-02-13T16:17:19+5:30
येरवडा येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने पाठपुरावा करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभयारण्य परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती
येरवडा: पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्या दृष्टीने महसूल विभागाकडील येरवड्यातील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. येरवडा येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने पाठपुरावा करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभयारण्य परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, "डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील पक्षी आणि वन्यजीवांना सुरक्षितता अधिवास मिळणे गरजेचे आहे. तसेच अभयारण्य परिसरातील अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असून संरक्षणाच्या दृष्टीने परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील वने वाचविण्यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे. पुणेकर नागरिक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक असून त्यांच्या सहकार्याने पुण्याला २०३०पर्यंत "कार्बन न्यूट्रल" शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
''अभयारण्य परिसरातील स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवावेत. नागरिकांनी या ठिकाणी भेटी देऊन पर्यावरणाच्या दृष्टीने या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन यावेळी पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी केले.''
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सुनील टिंगरे, माजीमंत्री सचिन अहिर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभयारण्य बचाव समिती सदस्य व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अभयारण्य परिसरात होत असलेल्या विविध कामांची माहिती दिली.