Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू अनंतात विलीन ; मान्यवरांनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 02:16 PM2019-12-20T14:16:31+5:302019-12-20T14:30:24+5:30
Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
पुणे : रंगभूमीवरील नटस्रमाट डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमिमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई, दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेत्री उर्मिला माताेंडकर तसेच चित्रपट- नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित हाेते.
मंगळवारी रात्री डाॅ. श्रीराम लागू यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट- नाट्यसृष्टीत एकप्रकारे पाेकळी निर्माण झाली. त्यांचा मुलगा आनंद हा अमेरिकेवरुन येणार असल्याने त्यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते. त्यांचा मुलगा अमेरिकेवरुन परतल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले हाेते. मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक अमाेल पालेकर, खासदार गिरीष बापट, महापाैर मुरलीधर माेहाेळ आदींनी यावेळी लागूंना आदरांजली वाहिली.
लागूंना आदरांजली वाहताना सुभाष देसाई म्हणाले, लागू यांनी मराठी रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शतकात असा कलाकार हाेणार नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार चित्रपट आणि नाट्यसृष्टीत उदयाला आले. ही प्रेरणा सातत्याने नव्या पिढीला मिळत राहील याची मला खात्री आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिका विसरता येणे शक्य नाही.
उर्मीला माताेंडकर म्हणाल्या, माझं चित्रपटसृष्टीतील पदार्पण डाॅ. लागूंमुळे झालं. मी 7 वर्षाची असताना त्यांनी त्यांच्या एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यावेळी माझे काम पाहून ते म्हणाले हाेते की ही एक दिवस माेठी अभिनेत्री हाेईल. मी त्यांची ऋणी आहे. ते एक कलाकार म्हणून जितके महान हाेते, तितके ते एक माणूस आणि विचारवंत म्हणून देखील महान हाेते. त्यांच्या विचारांवर ते कायम ठाम राहिले.
जब्बार पटेल म्हणाले, डाॅ. हे रंगभूमीवरचे नट हाेते. रंगभूमीवर त्यांनी जे केले ते खूप अभ्यासपूर्वक हाेते. कुठल्याही भूमिकेला सामाेरे जाताना ते व्यक्तिरेखा समजून खाेलवर जात ते काम करत असायचे. त्यांनी केलेल्या भूमिका नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगळ्या वाटतात. नटसम्राट हा त्यांच्या नाटकाच्या सगळ्या प्रतिभेचा उच्चांक हाेता. त्यांनी म्हंटलेलं स्वगत अजरामर आहेत. सिनेमात त्यांच मन फार रमलं नाही परंतु त्यांनी केलेल्या सिनेमामध्ये त्यांनी रंगभूमिवरची आंतरिक ताकद लावून त्या उत्तम पद्धतीने साकार केल्या.