डॉ. सुब्बय्या अरूणन यांना ‘टिळक सन्मान’
By admin | Published: July 25, 2015 01:15 AM2015-07-25T01:15:36+5:302015-07-25T01:15:36+5:30
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिले जाणारे ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ या वर्षी इस्रोच्या ऐतिहासिक मंगळयान मोहिमेचे
पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिले जाणारे ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ या वर्षी इस्रोच्या ऐतिहासिक मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक व विख्यात शास्त्रज्ञ डॉ. सुब्बय्या अरुणन यांना प्रदान केले जाणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक या वेळी उपस्थित होते.
डॉ. सुब्बय्या अरुणन यांचे चांद्रयान मोहिमेत भरीव योगदान होते. ही मोहीम यशस्वी केल्यामुळे त्यांच्याकडे इस्रोने मंगळयान मोहिमेच्या प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी सुपूर्द केली. त्यांच्या नेतृत्वाखाली ५०० शास्त्रज्ञ दीड वर्ष मंगळयान मोहिमेसाठी प्रयत्न करीत होते, त्या भारताने इतिहास घडवला. जागतिक स्तरावर अंतराळ मोहिमांमध्ये भारताची आज गणना केली जाते. देशाला हे स्थान मिळवून देण्यातील डॉ. अरूणन यांचे मोलाचे कार्य लक्षात घेऊन ट्रस्टच्या विश्वस्तांनी लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिकासाठी त्यांची एकमताने निवड केली. सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. समाज व राष्ट्रासाठी सेवाभावी वृत्तीने सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तिला हे पारितोषिक देऊन गौरविले जाते.