Dr. DY Patil महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये CCTV; प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:46 IST2023-07-06T14:46:59+5:302023-07-06T14:46:59+5:30
महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावले असून विद्यार्थ्यांकडून ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याच्या बजरंग दलाचा आरोप

Dr. DY Patil महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये CCTV; प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप
पुणे : पुण्यातील तळेगावात डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात काल एक धक्कादायक प्रकार समोर आला. महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावले असून विद्यार्थ्यांकडून ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याच्या आरोप बजरंग दलाने केला आहे. याप्रकरणी प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाणही झाली असून हा प्रकार थांबवून प्राचार्यांची बदली करा अशी मागणी केली जात आहे.
महाविद्यालयातील शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी बजरंग दलाकडे याबाबत तक्रार केली असल्याचे दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर तातडीने त्यांनी महाविद्यालयात जाऊन पाहणी केली असता दोन्ही गोष्टी निदर्शनास आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत पालकांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु प्राचार्यांनी दुर्लक्ष केल्याचे पालकांनी सांगितले आहे. त्यानंतर बजरंग दलाने हा प्रकार थांबवण्यासाठी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत.
महाविद्यालयात उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगलं आहे. त्यामुळं लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही नेमके कोणत्या कारणासाठी बसवण्यात आले होते? यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही आहे. बजरंग दल आणि पालकांकडून प्राचार्यांच्या बदलीची मागणी होऊ लागली आहे. तसेच ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याचा प्रकार तातडीने थांबवण्यात यावा अशी मागणी देखील पालकांनी केली आहे.
प्राचार्यांची लवकरात लवकर बदली करावी
आमच्या मुलांकडून दररोज ख्रिश्चन समाजाची प्रार्थना म्हणून घेतली जाते. तसेच त्यांना टॉर्चर केले जात आहे. हिंदूंच्या कुठल्याही सणाला मुलांना सुट्टी दिली जात नाही. तसेच लेडीज टॉयलेटमधेही सीसीटीव्ही लावल्याचा धक्कादायक प्रकार आमच्यासमोर आला आहे. याबाबत संस्थेने कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच अशा प्राचार्यांची लवकरात लवकर बदली करावी. अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे