ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

By श्रीकिशन काळे | Published: October 6, 2024 03:28 PM2024-10-06T15:28:33+5:302024-10-06T15:29:09+5:30

दिल्लीमध्ये पुढील वर्षी होणार साहित्य संमेलन.

Dr. Tara Bhawalkar selected as president of 98th akhil bharatiy marathi sahitya sammelan | ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

श्रीकिशन काळे/ पुणेदिल्लीमध्ये होऊ घातलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी रविवारी पुण्यात केली. याप्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. 

ताराबाई या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन, लेखन केले आहे.

संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी (दि.५) आणि रविवारी (दि.६) महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम, ग्रंथ दालन, ग्रंथ दालनातील स्टॉलचे भाडे आदी विषयांवर चर्चा करण्यात आला. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावावर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली.

गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन घेण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र काही कारणास्तव दिल्लीला संमेलन होऊ शकले नाही. यंदा मात्र सरहद संस्थेला दिल्लीत संमेलन आयोजनाचा मान मिळाला. याआधी १९५४ मध्ये दिल्लीत संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. आता ७० वर्षांनंतर पुन्हा दिल्लीत येत्या फेब्रुवारीमध्ये ९८ वे साहित्य संमेलन होणार आहे. 

संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. तारा भवाळकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते अभय बंग आदी नावांचीही चर्चा होती. पण भवाळकर यांनी बाजी मारली.

लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ. तारा भवाळकर हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व आहे. लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते. १ एप्रिल १९३९ या दिवशी जन्मलेल्या ताराबाई आज वयाच्या ८३ व्या वर्षीही लिखाणापासून समाजमाध्यमांपर्यन्त सर्वत्र कमालीच्या सक्रिय असतात. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने कार्यरत आहेत. साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांना पाहिले की, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्यांच्यात दिसून येते.

डॉ. भवाळकर यांची मराठीतील ख्यातनाम लेखिका, लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा संशोधक संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृतीपासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक, साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका, एक कसदार वक्त्या अशी विविधांगी ओळख महाराष्ट्राला झालेली आहे.

ताराबाईंनी १९५८ ते १९७० या काळात माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केले. १९७० ते १९९९या काळात सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.

‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण : प्रारंभ ते १९२० ‘ या त्यांच्या पीएचडी प्रबंधाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अभ्यास व संशोधनासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. अनेक विद्यापीठांच्या विविध समित्यांवर तज्ञ म्हणून काम केले आहे. अमेरिका व इंग्लंड येथील विद्यापीठातही त्यांनी साहित्य विषयक चर्चासत्रात आपली भूमिका मांडली आहे. मराठी विश्वकोष, मराठी वाङ्मयकोष, मराठी ग्रंथकोष, मराठी समाजविज्ञान कोष, मराठी चरित्र कोष अशा विविध संदर्भ ग्रंथासाठी त्यांनी लेखन केले असून, मराठी विश्वकोशाच्या लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादकही होत्या. अनेक लहान मोठ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. दिवंगत डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या बरोबर त्यांनी लिहिलेले ‘महामाया’ पुस्तकही फार महत्वाचे समजले जाते.

ताराबाईंनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशानाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैध्दांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच केला आहे. त्यांनी आपल्या लोकसाहित्यात आणि लोकपरंपरेत निसर्गाची पूजा केलेली दिसते. माणूस आणि निसर्ग यांच्यातील सौदार्हपूर्ण नात्याचे संदर्भ वारंवार येतात. ताराबाइंनी नेहमीच आपल्या लेखनातून त्याचा पुरस्कार केलेला दिसतो.
 
अनेक पुरस्कारांनी ताराबाईंचा गौरव !
विविध संस्थांनी ताराबाई यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यामध्ये लेखन व संशोधनाबद्दल महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि. मा. गोखले पुरस्कार, मसाप गौरव पुरस्कार, पुणे नगर वाचनालयाचा श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा डॉ. अ. ना. प्रियोळकर पुरस्कार, सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा रत्न शारदा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा विशेष सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचेही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र फांउडेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गेल्या वर्षी पुण्यात सन्मानित केले.

Web Title: Dr. Tara Bhawalkar selected as president of 98th akhil bharatiy marathi sahitya sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.