डाॅ. ठाकुर यांच्या पदमुक्तीची ऑर्डर अडकली काेठे? ससूनमध्ये ऑर्डर ची प्रतीक्षाच
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 21, 2023 10:21 PM2023-11-21T22:21:13+5:302023-11-21T22:21:31+5:30
डाॅ. देवकाते यांच्या निलंबनाची ऑर्डर मिळाली पण डाॅ. ठाकुर यांची गेली काेठे ?
ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात चाैकशी समितीने ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकुर यांचा पदभार काढला तर अस्थिराेग विभागाचे पथकप्रमुख डाॅ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन केले. यापैकी डाॅ. देवकाते यांची ऑर्डर आली पण डाॅ. ठाकुर यांची पदमुक्तीची ऑर्डर अदयापही आलेली नाही. त्यामुळे, वैदयकीय शिक्षण विभागाच्या प्रशासनाचे येथेही डाॅ. ठाकुर यांच्यावर विशेष ‘प्रेम’ असल्याची चर्चा ससूनमध्ये सूरू झाली आहे.
ललित पाटील प्रकरणात वैदयकीय शिक्षण संचालक डाॅ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या प्रकरणाची ओढून ताणुन चाैकशी झाली. चाैकशी अहवाल शासनाला सादर करूनही त्याबाबत लवकर कारवाई केली गेली नाही. न्यायालयाने डाॅ. ठाकुर यांचे पद रदद केल्यावरच वैदयकीय शिक्षण विभागाने ‘माैके पे चाैका’ मारत डाॅ. ठाकुर आणि डाॅ. देवकाते यांच्यावर कारवाई केली.
कारवाई केल्यावर डाॅ. देवकाते यांची निलंबनाची ऑर्डर बीजे प्रशासनाला दुस-या दिवशी तात्काळ मिळाली. परंतू, डाॅ. ठाकुर यांचा पदभार काढल्याची ऑर्डर बीजे प्रशासनाला मात्र, दहा दिवस लाेटले तरीही मिळालेली नाही. त्यामुळे, हा दुटप्पीपणा का, असाही प्रश्न आता विचारला जात आहे. यानंतर वरिष्ठ म्हणून डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांना अधिष्ठाता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. दाेन दिवसांपासून डाॅ. शिंत्रे रजेवर असल्याने उपअधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान यांना अधिष्ठाता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले की, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले असून. या निर्णयाचा आदेश महाविद्यालय प्रशासन आणि डॉ. ठाकूर यांना पाठविण्यात आला आहे. परंतू, मग ऑर्डर अडकली काेठे असा प्रश्न आता उपस्थित हाेत आहे.
डाॅ. ठाकुर यांना सन्मानीय एक्झिट
डाॅ. ठाकुर यांना निलंबित करण्याऐवजी केवळ पदभार काढून शासनाने त्यांना ससूनमधील ड्रग्ज तस्करी आणि ड्रग्ज तस्कर ललित पाटील पंचतारांकित उपचार प्रकरणातून सन्मानीय एक्झिट दिल्याचीही चर्चा ससूनमध्ये रंगत आहे. दुसरीकडे डाॅ. देवकाते यांचा मात्र बळी दिल्याचीही कुजबूज हाेते आहे.