पावसाळ्याच्या तोंडावर नाले तुंबलेले
By admin | Published: May 15, 2016 12:36 AM2016-05-15T00:36:41+5:302016-05-15T00:36:41+5:30
नेहरुनगर, भोसरी, एमआयडीसी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात अद्याप नालेसफाई सुरू केली नसल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आले.
पिंपरी : नेहरुनगर, भोसरी, एमआयडीसी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी भागात अद्याप नालेसफाई सुरू केली नसल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. नाल्यात पडलेला राडारोडा, पोती, कागद, प्लॅस्टिक यांमुळे काही भागांतील नाले तुंबले आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाईल का नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
नेहरुनगर परिसरात तर नाल्यावरच अनेक टपऱ्या उभारल्या आहेत. याच ठिकाणी भंगाराचे दुकान आहे.आजूबाजूचे भंगार गोळा करणारे लोक या दुकानात माल आणून देतात. दुकानदाराकडून न लागणारा माल या नाल्यात टाकला जातो, असे येथील नागरिकांनी सांगितले.
भोसरी रस्त्यावरील ‘इ’ ब्लॉकमधील एका नाल्याच्या आजूबाजूला सर्व कंपन्या आहेत. या कंपन्यांचे सांडपाणी व रसायणमिश्रित पाणी नाल्यात सोडले जाते. अनेक वर्षांपासून हा नाला साफच केला नसल्याचे लोक सांगतात. नाल्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे नाल्यातील पाणी पुढे जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे. वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये विषारी सापांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. लांडेवाडी चौकातील झोपडपट्टीलगत असलेल्या नाल्यातील कचरा काढला जात नसल्याने तेथे दुर्गंधी पसरली आहे. (प्रतिनिधी)नाल्यात कंपनीचे सांडपाणी
निगडी-भोसरी टेल्को रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयाशेजारी असलेला नाला टाकलेला राडारोडा यामुळे दिसेनासा झाला आहे. गवत व झाडे वाढल्यामुळे नालाच दिसत नाही. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबून रस्त्यावरून वाहते व वाहतूककोंडी निर्माण होते. अपघातही घडतात, असे आजूबाजूच्या व्यावसायिकांनी सांगितले. हाच नाला पुढे एमआयडीसीतून वाहतो. त्या ठिकाणी नाल्यात कंपनीचे सांडपाणी सोडले जाते.उद्यानातही दुर्गंधीचा त्रास
चिंचवड परिसरातील एक उद्यान नाल्याच्या बाजूला उभारले आहे. नाल्यातील अस्वच्छतेमुळे उद्यानातही दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होऊ लागली आहे. पिंपरी परिसरात टेम्पो चौक व लिंक रस्ता या ठिकाणचे नाले थेट नदीत सोडले जातात. यामुळे पवना नदी दूषित झाली आहे. संजय गांधीनगरमध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे नदी व नाल्यातील पाणी कमी झाले आहे. या वर्षी नदी व नाल्यातील गाळ काढून नदीचे पात्र रुंद केले व स्वच्छता केली, तर पावसाळ्यात पाणी साठवून त्याचा वर्षभर वापर करता येईल, अशा सूचनाही काही नागरिकांनी केल्या आहेत.ठेकेदारांची दिरंगाई
दर वर्षी महापालिकेकडून नालेसफाईचा ठेका दिला जातो. मात्र, ठेकेदारांकडून कधीच वेळेत काम होत नाही. पाऊस सुरू झाल्यावर नाले आपोआप पावसाच्या पाण्याने साफ होतात. धुऊन निघतात. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जाते. महापालिकेकडून नालेसफाई करण्याचे पैसे घेतले जातात. मात्र, पावसाने नाले साफ झाल्यावर ठेकेदारांचे काम निम्म्यापेक्षा सोपे होते. आता नालेसफाई केली जाईल का नाही, याबाबत शंका असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.