नळ-पाणीपुरवठा योजना निकृष्ट, घोडेगावला ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:00 AM2018-08-18T00:00:22+5:302018-08-18T00:14:25+5:30
घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परांडा व सालोबामळा या भागासाठी केलेल्या नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती आंबेगाव यांना प्राप्त झाला
घोडेगाव - घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परांडा व सालोबामळा या भागासाठी केलेल्या नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती आंबेगाव यांना प्राप्त झाला असून यातील दोषी ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका उपप्रमुख अमोल काळे यांनी केली आहे़
परांडा व सालोबामळा येथील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी सन २०११ मध्ये ७७़ ६९ लाख रूपयांची पाणी योजना मंजूर झाली़ हे काम सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने निविदेमध्ये ठरवून दिलेले नियम डावलून काम केले़
याबाबत अमोल काळे यांनी शासनाकडे तक्रार केली होती़ यावरून स्थानिक गुणनियंत्रक विभागाने चौकशी केली़
या चौकशीचा अहवाल आला असून काम करताना ठेकेदाराने
जीआय पाईप टाकण्याऐवजी पीव्हीसी पाईप टाकले. मुरुम खोदाईचे काम जास्त दाखवून रक्कम वाढून लावली़ हा सर्व भ्रष्टाचार तत्कालीन पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने
केला आहे़
तसेच हे काम निकृष्ट झाल्याने ग्रामसभेने ठेकेदारास पाच टक्के दंड आकारला आहे़ हे करताना
शासनाची व घोडेगाव ग्रामस्थांची फसवणूक झाली असून शासननिर्णयानुसार अपहाराची रक्कम व ग्रामसभेने आकरलेला दंड संबंधितांकडून वसूल केला जावा, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमोल काळे यांनी केली आहे़
ही कारवाई दि़ ३० आॅगस्टपर्यंत झाली नाही तर घोडेगाव येथे
पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार
असल्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला असून तसे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहे़
अहवाल सादर करा
याबाबत गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. या योजनेच्या चौकशी अहवालानुसार शासन निर्देशित कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.