ड्रेनेजलाईन फुटल्याने सांडपाणी बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:07 AM2018-11-12T02:07:08+5:302018-11-12T02:07:26+5:30
मार्केट यार्डात प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड लगतीच्या आंबेडकरनगरजवळील महापालिकेची ड्रेनेजलाईन फुटली आहे. या ड्रेनेजलाईनमधील सर्व सांडपाणी थेट मार्केट यार्डमध्ये येत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या सांडपाण्यामुळे बाजार घटाकातील आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित ड्रेनेजलाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
बाजाराच्या गेट क्रमांक ४ च्या बाजूस बाजार समितीच्या मोकळ्या जागेनजीक झोपडपट्टी आहे. या मोकठ्या जागेचा वापर उघड्यावर शौचालयास जाण्यासाठी नागरिकांकडून केला जातो. यामुळे येथे अगोदरच प्रचंड दुर्गंधी असते. त्यात मार्केट यार्ड पिछाडीला आंबेडकरनगरजवळील ड्रेनेजलाईन फुटल्याने त्यामधून येणारे सांडपाणी हे मार्केट यार्डमधील गेट नं. ४ मधून आतमध्ये येत आहे. त्यामुळे या परिसरामधे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सांडपाण्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. त्यामुळे ग्राहक व शेतकरी यांनी बाजार आवारामधे यायचे का नाही, असा प्रश्न केला जात आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी सांगितले, की महापालिकेच्या वतीने या परिसरात टाकलेली ड्रेनेज लाईन खूप जुनी व लहान आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे; परंतु ड्रेनेजलाईन लहान असल्याने अतिपाण्याचा ताण येऊन वारंवार फुटते. यामुळे या ड्रेनेजलाईनमधील सर्व सांडपाणी थेट मार्केट यार्डच्या परिसरात येते.
याबाबत महापालिका आणि बाजार समितीच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. ही ड्रेनेजलाईन तातडीने बदली करून नवीन ड्रेनेजलाईन टाकण्याची मागणी केल्याचे नांगरे यांनी सांगितले.