बाणेरमधील ड्रेनेजव्यवस्था कालबाह्य

By admin | Published: May 31, 2017 02:41 AM2017-05-31T02:41:29+5:302017-05-31T02:41:29+5:30

बाणेर परिसराचा वेगाने विकास होत असताना बाणेर गावठाण व पॅनकार्ड क्लब रस्त्यावर मात्र अनेक समस्या आजही आ वासून उभ्या

Drainage system in Baner has expired | बाणेरमधील ड्रेनेजव्यवस्था कालबाह्य

बाणेरमधील ड्रेनेजव्यवस्था कालबाह्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बाणेर : बाणेर परिसराचा वेगाने विकास होत असताना बाणेर गावठाण व पॅनकार्ड क्लब रस्त्यावर मात्र अनेक समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. जुने ड्रेनेज, अर्धवट बांधकाम झालेले ड्रेनेजचे पाईप आणि पाण्याच्या जुन्या पाइपलाइनसोबत रस्त्यालगत असलेला राडारोडा, कचरा, अर्धवट स्थितीतील पदपथ तसेच कचऱ्याने तुडुंब भरलेले नाले आदी समस्यांमुळे या परिसरातील नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.
बाणेर गावातील बहुसंख्य घरे दाटीवाटीची आहे. त्यात आता गावठाणातील रहिवाशांनी अतिरिक्त बांधकामदेखील केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावठाणाची सर्वांत मोठी समस्या येथील जुन्या ड्रेनेज लाइनची आहे. जुने गावठाण असल्याने येथील सर्व ड्रेनेज व्यवस्था जुनी झाली आहे. नागरिकांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्या मागे लागून ही व्यवस्था काही प्रमाणात सुधारून घेतली. मात्र हे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे जुनी ड्रेनेज व्यवस्था यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरण्याची भीती आहे.
बाणेर रस्त्यावरील संतोष कटिंग सलूनच्या डावीकडे वळून बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रस्ता व धनकुडे वस्तीकडे जाणारे असे एकूण तीन रस्ते आहेत. यापैकी पॅनकार्ड क्लब रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे़ अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे साचलेले आहेत़ एखादा पाऊस पडला तर ही सर्व माती रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल होऊ शकतो़ त्यातून दुचाकी वाहने घसरून पडण्याची शक्यता आहे़ डाव्या बाजूला छोट्या टेकड्या असून पाऊस पडला तर पावसाचे पाणी व हा मातीचा ढिगाऱ्यामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांना चालणेही अशक्य होऊन बसणार आहे़ या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झाला नाही तर या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
या रस्त्यावरील अनेक विजेचे खांब अक्षरश: वाकले असून, रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईटचा पत्ता नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा तोंडावर असताना बाणेर, बालवाडीच्या मोठ्या भागात नालेसफाईची कामे सुरू आहेत, मात्र या परिसरातील एकाही नाल्याला अद्याप हातही लागला नाही.
सर्व नाल्यांमध्ये कचऱ्याचे व घाणीचे अक्षरश: साम्राज्य पसरले असून जाता-येताना नागरिकांना नाक मुरडून या रस्त्यावरून जावे लागत आहे.

रस्त्यावर मातीचे ढिगारे
बाणेर रस्त्यावरून पॅनकार्ड क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचे काम अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी रस्ता खोलवर खोदून ठेवला असून रस्त्यावरच मातीचे मोठे ढिगारे उभे करून ठेवले आहेत.
त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा येत आहे. तसेच ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

गावठाणात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या धोकादायक स्थितीत लटकत आहेत. या लटकत्या तारांमुळे गावठाण हे आजही ब्रिटिशांच्याच काळातील असल्याचा भास होतो.
महावितरण कंपनी झाली, मात्र गावठाणातील काही जुन्या विजेच्या खांबांनी अजून जागा सोडलेली नाही. उघड्यावरील तारांमध्ये अनेकदा तांत्रिक दोष निर्माण होतात आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. अनेक डीपी बॉक्स रस्त्यालगत बसविलेले आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा अंदाज न आल्याने डीपी बॉक्सला वाहने धडकण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत.

Web Title: Drainage system in Baner has expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.