नाले आणि कालवे बनले मृत्यूचे सापळे
By admin | Published: January 9, 2017 03:47 AM2017-01-09T03:47:43+5:302017-01-09T03:47:43+5:30
शहराच्या मध्यभागामधून वाहत असलेले नाले आणि कालव्यांच्या पात्रांमध्ये कोणत्याही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्यामुळे
पुणे : शहराच्या मध्यभागामधून वाहत असलेले नाले आणि कालव्यांच्या पात्रांमध्ये कोणत्याही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्यामुळे ते मृत्यूचे सापळे बनल्याचे चित्र आहे. शनिवारी अंबिल ओढ्यातील नाल्यामध्ये १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर चार महिन्यांपूर्वी एका चार वर्षांच्या मुलाचा कसबा पेठेतील नाल्यामध्ये मृतदेह आढळून आला होता. महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडून नागरिकांच्या जीविताबाबत दाखवला जाणारा हलगर्जीपणा प्राणांवर बेतू लागला आहे.
नाल्यातील मोकळ्या जागेत खेळत असताना पाण्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या गणेश चांदणे या मुलाचा प्रवाहासोबत वाहत जाऊन बुडून मृत्यू झाला. ही घटना जशी हळहळ व्यक्त करायला लावणारी आहे, तशीच ती प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेमुळे होणाऱ्या नुकसानीचीही आहे. संपूर्ण अंबिल ओढ्यामध्ये जागोजाग तुटलेले संरक्षक कठडे, सुरक्षा जाळ्याच बसविण्यात आलेल्या नसल्याचे निदर्शनास आले. यासोबतच बऱ्याच ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले दिसतात. महापालिकेच्या वतीने अशास्त्रीय पद्धतीने केले गेलेले काम या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे.
भवानी पेठेमधून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला कासेवाडी, लोहियानगर, गंज पेठ, नाना पेठ अशा कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत. नाल्याला अगदी लागून असलेल्या घरांमधील रहिवाशांचा आणि विशेषत: लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमचाच आहे. येथे बांधण्यात आलेल्या पुलांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या या जाळ्यांची अवस्था फारच वाईट आहे. जागोजाग तुटलेल्या या जाळ्यांमधून लोक ये-जा करीत असतात. तर दत्तवाडी, सारसबाग या भागामधून वाहणाऱ्या नाल्यांवर उभारण्यात आलेले सुरक्षा कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे या भागातही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सुरक्षाभिंतही तुटलेल्या अवस्थेत असल्याने येथून नाल्यात सहज प्रवेश करता येतो. नाल्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्यही मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पद्मावतीजवळील नाल्याच्या कडेलाच घरे आणि मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत. काहींनी तर थेट नाल्याच्या जागेमध्येच बांधकामे केलेली आहेत. शेजारी असलेल्या मनपाच्या पोटे दवाखान्याला याचा नेहमी त्रास सहन करावा लागतो.