पुण्यातील ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:15 PM2020-04-16T22:15:24+5:302020-04-17T00:15:11+5:30
ससूनमधील कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याने ही बदली करण्यात आल्याची चर्चा..
पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी बदली केली आहे. रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसात ३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याने ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. या इमारतीत रुग्णांवर उपचारही सुरू झाले आहेत. त्यापूर्वी जुन्या इमारतीतील २७ व २८ क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये दि. ३१ मार्च पासून बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसापासूनच बाधित रुग्णांच्या मृत्यू चे प्रमाण वेगाने वाढत गेले. दररोज किमान एक तरी मृत्यू होत आहे. त्यामुळे १६ दिवसातच हा आकडा ३८ वर पोहचला. देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू दरात पुणे आघाडीवर आहे. हेच कारण चंदनवाले यांना भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्या विषयी काही राजकीय नेत्यांनी शासनाकडे तक्रारी ही केल्या होत्या. त्यांच्या निष्काळजीपणा मुळेच मृत्यू वाढल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच शासनाने मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स ही स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
सध्या त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. आता या पदाची पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली आहे. तर ससून चा पदभार उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. यांनी यापूवीर्ही ही जबाबदारी सांभाळली आहे.
---------
शासन आदेशाचे पालन केले जाईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदावर बदली झाली आहे. शुक्रवारी डॉ. तांबे यांच्याकडे पदभार सोपविला जाईल.
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
-----
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याविषयी तक्रार केली होती. त्यांनी खातरजमा आणि चौकशी करून योग्य निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो. ससूनमध्ये कोरोनाच्यादृष्टीने अत्यंत असंवेदनशील कारभार त्यांनी केला. ससूनकडे सीएसआर फँडातील २२ कोटी रुपये पडून आहेत. ते कोरोनासाठी का वापरले गेले नाहीत? चंदनवाले यांच्या गैरकाराभराचे पुरावे कागदपत्रे व व्हिडिओसह कोरोनाचे संकट टळल्यावर सादर करणार आहे.
- अरविंद शिंदे, महापालिका गटनेते, काँग्रेस