नाटक अन् चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला; रमेश देव यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 11:07 AM2022-02-03T11:07:35+5:302022-02-03T11:08:44+5:30

नाटक अथवा मराठी व हिंदी चित्रपट असोत, भूमिका कुठलीही असो, ती चोख बजावून प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता

Drama and film industry lost talented actor ramesh deo said artists | नाटक अन् चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला; रमेश देव यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

नाटक अन् चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला; रमेश देव यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

पुणे : नाटक अथवा मराठी व हिंदी चित्रपट असोत, भूमिका कुठलीही असो, ती चोख बजावून प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रसन्न चेहरा, साधी राहणी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटायचे. त्यांच्या साधेपणात उच्च दर्जाचा अभिनेता दडला होता. त्यांच्या जाण्याने नाटक आणि चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना नाट्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

गुणी कलाकार हरपला

रमेश देव यांच्यासमवेत एका नाटकात आणि ‘साता जन्माची सोबती’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. कायम हसतमुख चेहरा, सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती, जो भेटेल त्यांची आपुलकीने चौकशी करणे, चुकूनही कोणाची निंदा न करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या हस्ते मला जेजुरीभूषण पुरस्कारही मिळाला होता. एक गुणी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. याचे अत्यंत वाईट वाटत आहे. -  लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री

ती भेट राहूनच गेली...

रमेश देव यांच्या ३० जानेवारीला वाढदिवसाच्या दिवशी फोनवर बोलणे झाले होते. आम्ही अर्धा तास छान गप्पा मारल्या. कधी भेटायला येतेस असे विचारले आणि मी २० फेब्रुवारीनंतर नक्की येण्याचे वचन दिले. पण आमची भेट राहूनच गेली याचे खूप वाईट वाटते. रमेश देव यांच्यासमवेत ‘गहिरे रंग’ हे नाटक आणि ‘वेगळं व्हायचंय मला’ या चित्रपटात काम केले होते. दोघांशी खूप चांगलं नातं होतं. दोघेही खूप महान कलाकार. माझे भाग्य आहे की त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले. - आशा काळे, ज्येष्ठ अभिनेत्री

पारदर्शी अभिनेता

जुन्या पिढीतील मोठे अभिनेते होते. चंद्रकांत मांडरे यांच्यानंतर वास्तविक भूमिका त्यांनी पडद्यावर मांडल्या. पारदर्शी व्यक्तिमत्त्व होते. मध्यमवर्गीय मराठी रसिकांवर त्यांची भुरळ होती. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही योगदान दिले. फोन नंबर ३३३३ हे त्यांचे गाजलेले नाटक. या नाटकाचे राज्यभरात अनेक प्रयोग झाले. ‘तुझं आहे तुझपाशी’ या नाटकातही रमेश देव आणि सीमा देव यांनी भूमिका केल्या आहेत. - सतीश आळेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक.

चित्रपटातील भूमिकांचे प्रेक्षकांच्या मनावर होते गारुड 

रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केले. रमेश आणि सीमा देव कायम उत्साही असायचे. भूमिका कोणतीही असो; रमेश देव त्याबाबत सकारात्मक असायचे. ते यशस्वी जीवन जगले. त्यांच्या मराठी चित्रपटातील भूमिकांचे प्रेक्षकांच्या मनावर गारुड होते. ते त्यांच्या चित्रपटातील भूमिकांच्या माध्यमातून कायम आपल्यात राहतील. - डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते.

रंगभूमीवरील प्रसन्न चेहरा हरपला

सोलापूरला मित्र पृथ्वीराज बायस यांचे मामा म्हणून अभिनेते रमेश देव यांना पहिल्यांदा पाहिले. गदिमा, सुधीर फडके, राजा परांजपे यांनी मराठी चित्रपटांचा नवीन काळ आणला. त्याचा चेहरा रमेश देव होते. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ आठवायचा असेल तर नायक आणि खलनायक म्हणून त्यांचा प्रसन्न चेहरा आठवावाच लागेल. रमेश देव यांच्या बोलण्यातला गोडवा आणि उमदे व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहील. वडिलकीचा आधार गेला आहे. - डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक.

रमेश देव माझ्यासाठी दैवतच

'' सर्जा'' चित्रपटाची निर्मिती देव कुटुंबीयांनी केली. पहिल्याच चित्रपटात मला अभिनेत्री होण्याची संधी त्यांनी दिली. वडील आणि काकांचे मित्र म्हणून रमेश काकांचे आमच्याशी घरोब्याचे नाते होते. जेव्हा चित्रपटाचे शुटिंग सुरू होते, तेव्हा त्यांच्या घरीच राहत होते. त्यांच्या शेवटच्या क्षणात त्यांची भेट होऊ शकली नाही याचे वाईट वाटते. माझ्यासाठी रमेश देव हे दैवतच होते. त्यांना माझ्याकडून विनम्र श्रद्धांजली. - पूजा पवार, अभिनेत्री

Web Title: Drama and film industry lost talented actor ramesh deo said artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.