मराठी बालकवितांचा नाट्याविष्कार - कवितांच्या गुदगुल्या! (कलारंग पान)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:18+5:302021-03-26T04:11:18+5:30

रंगभाषातर्फे २० मार्च रोजी जागतिक बालरंगभूमी दिनाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ह्या नव्या कार्यक्रमाचे ...

Drama Discovery of Marathi Children's Poems - Tickling of Poems! (Kalarang Paan) | मराठी बालकवितांचा नाट्याविष्कार - कवितांच्या गुदगुल्या! (कलारंग पान)

मराठी बालकवितांचा नाट्याविष्कार - कवितांच्या गुदगुल्या! (कलारंग पान)

Next

रंगभाषातर्फे २० मार्च रोजी जागतिक बालरंगभूमी दिनाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ह्या नव्या कार्यक्रमाचे नाव ''कवितांच्या गुदगुल्या'' असे असून लहान मुलांसाठीच्या मराठी कवितांचे नाट्यसादरीकरण असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. आतापर्यंत कार्यक्रमाचे चार प्रयोग झाले असून पुढचा प्रयोग ४ एप्रिल रोजी होणार आहे.

एरवी कविता वाचल्या जातात, थोड्या प्रमाणात सादरही होतात, पण हा संपूर्ण कार्यक्रम कवितांच्या नाट्यसादरीकरणाचा असणार आहे. ह्या कार्यक्रमात मराठी बालकविता गाणे, नाच आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर होणार आहेत. ह्या कार्यक्रमाद्वारे मराठी कविता मनोरंजनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचाव्यात, या हेतूने ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

कार्यक्रमात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, बहिणाबाई, मंदाकिनी गोडसे, शांताबाई शेळके, डॉ. अरुणा ढेरे, अनंत भावे, संदीप खरे, डॉ. संगीता बर्वे, शोभा भागवत, शशांक पुरंदरे ह्या कवींच्या कविता सादर होणार आहेत. तर ह्यातील अनंत भावे आणि डॉ.संगीता बर्वे यांच्या कवितांना अनुक्रमे वर्षा भावे आणि आशिष मुजुमदार यांचे संगीत आहे. ह्या कार्यक्रमात श्रीधर कुलकर्णी, संतोष माकुडे, सुरभी नातू, कल्याणी देशमुख, अनीश राईलकर हे कलाकार ह्या कविता सादर करणार असून कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन निखिल गाडगीळ यांचे आहे.

लॉकडाऊनला आणि सततच्या डिजीटल स्क्रीनला कंटाळलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही "कवितांच्या गुदगुल्या" हा कार्यक्रम म्हणजे आनंदाची मोठी पर्वणी असेल, असा विश्वास आम्हाला वाटतो. सदर कार्यक्रमाचे पहिले चार प्रयोग २० मार्च २०२१ रोजी सादर झाले असून कार्यक्रमाचा कालावधी सलग एक ते सव्वा तास असा असून कार्यक्रम सशुल्क आहे. या कार्यक्रमाचा पुढील (पाचवा) प्रयोग रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे होणार आहे.

Web Title: Drama Discovery of Marathi Children's Poems - Tickling of Poems! (Kalarang Paan)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.