आता संपूर्ण वर्षभर सुरु राहणार बालनाट्य कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 10:37 AM2019-06-04T10:37:59+5:302019-06-04T10:40:01+5:30
बालनाट्य असो किंवा अभिनय शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते.
पुणे : बालनाट्य असो किंवा अभिनय शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते. यावर बालरंगभूमी परिषद पुणे शाखेने एक उत्तम पर्याय शोधला असून, केवळ हंगामापुरत्याच या कार्यशाळा मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर या कार्यशाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे (मुंबई) अध्यक्ष प्रकाश पारखी आणि परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष उदय लागू यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अरूण पटवर्धन, कार्यकारी सदस्य देवेंद्र भिडे आणि दिपाली शेळके उपस्थित होते.
पारखी म्हणाले, आज काही शाळा सोडल्या तर बहुतांश शाळांमध्ये चित्रकला आणि संगीत या व्यतिरिक्त इतर कलांकडे दुर्लक्ष झालेले दिसते. नाटक हा विषय शाळांमध्ये शिकविलाच जात नाही, हे वास्तव आहे. यातच संगीत आणि नृत्य कलांसाठी शासनमान्य परीक्षा आहेत पण नाट्यकलांसाठी कोणत्याही परीक्षा नाहीत. यासाठी मी दोन वर्षांपूर्वी नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे प्रत्येक वयोगटातील मुलांकरिता ’बालनाट्य संस्कार, ‘किशोर नाट्यसंस्कार’ आणि कुमार नाट्यसंस्कार असा तीन परीक्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमानुसार कार्यशाळा झाल्यानंतर मुलांच्या परीक्षा घेतल्या जातात. याच अभ्यासक्रमानुसार आता बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखेच्या वतीने 7 ते 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी वर्षभर ज्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्यानंतर दर तीन महिन्यांनी कार्यशाळेत सहभागी विद्याथर््यांचे सादरीकरण होणार असून, वर्षाच्या शेवटी विद्याथर््यांची शंभर महिन्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये वाचिक,कायिक अभिनय, कथावाचन, अभिवाचन यांचा समावेश असेल. या परीक्षा नाट्यसंस्कार संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जातील.
शाळांमध्ये ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावा
शाळांमध्ये ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावा यासाठी वर्षभरापूर्वी तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम शासनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. मात्र तो शासनदरबारीच धूळ खात पडून आहे. त्यावर कोणत्याच प्रकारची हालचाल झाली नसल्याची खंत प्रकाश पारखी यांनी व्यक्त केली.