Ramesh Bais: शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस
By विश्वास मोरे | Published: August 14, 2023 05:50 PM2023-08-14T17:50:08+5:302023-08-14T17:50:19+5:30
आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले...
पिंपरी :शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील. केवळ साक्षर होणे पुरेसे नाही, तर एआय साक्षर होणे गरजेचे आहे. आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले.
पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बैस बोलत होते. या सोहळ्यास विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र - कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि डॉ. पी. एन. राजदान यांना डीलिट प्रदान करण्यात आली.
देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याची तयारी ठेवा
राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘नव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोत. याचा अर्थ असा नाही, की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजे. जे कुठले काम, नोकरी करत असू, त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजे. संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजे. प्रत्येक तरुणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजे. केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता देशाच्या, जगाच्या काेनाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवा.’’
राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘येत्या २०३० पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यातल्या ३७.५ कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णत: बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. आपल्याला मी सावध करू इच्छितो की, एआयच्या बाबतीत आपण जगातील काही देशांच्या मागे आहोत. मात्र, चांगली गोष्ट ही आहे की, भारतीय नव्या गोष्टी वेगाने शिकतात. नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय चटकन जुळवून घेतात. एआयच्या आगामी युगात निरंतर शिकत राहावे लागेल.
कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘‘शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत विद्यापीठ तडजोड करत नाही. त्यामुळेच नॅक मानांकनात चारपैकी ३.६४ गुण विद्यापीठाला मिळाले असून, ए प्लस - प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने पंधराव्या स्थानावर झेप घेतली आहे.