साहित्यातून मुलांचे भावविश्व रेखाटावे
By admin | Published: June 27, 2017 07:41 AM2017-06-27T07:41:04+5:302017-06-27T07:41:04+5:30
मुलांमध्ये संस्कारांचे बीज रुजण्यासाठी चांगल्या दर्जाचे बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, असे मत ल. म. कडू यांनी व्यक्त केले.
मुलांमध्ये संस्कारांचे बीज रुजण्यासाठी चांगल्या दर्जाचे बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, असे मत ल. म. कडू यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘साहित्य हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे. सध्याच्या काळात बालसाहित्य कमी होत आहे. मराठीमध्ये कुमारवाङ्मय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्या तुलनेत बालसाहित्याचे प्रमाण कमी आहे. मुळात, लहान मुलांच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच सकस साहित्यनिर्मितीकडे काना डोळा केला जातो. मराठी बालसाहित्यापुढे इंग्रजीमधील साहित्याचे मोठे आव्हान ‘आ’वासून उभे आहे. पालकांवर इंग्रजी माध्यमाचा मोठा पगडा पाहायला मिळतो. इंग्रजी साहित्यावर ताशेरे ओढण्यापेक्षा राम गणेश गडकरी यांच्यासारख्या साहित्यिकांच्या साहित्यकृती इंग्रजीमध्ये का भाषांतरित होत नाहीत, याचा विचार करण्याची गरज आहे. हे साहित्य मुलांनी इंग्रजीतून वाचल्यावरही त्यांच्यावर साहित्याचे संस्कार होऊ शकतात. शिक्षणाचे माध्यम आणि भाषा वेगळी असली तरी संस्कृती टिकवून ठेवता येऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे इंग्रजी भाषा समृद्ध होईल आणि संस्कृतीही टिकेल.
साहित्यामध्ये भाषा आणि रेषा हातात हात घालून चालतात. लहान मुलांचे साहित्य राक्षस, परिकथा यापुढे अभावानेच जाताना दिसतात. बालवयातील मुलांमध्ये रंग-रेषांची जागृती व्हावी यासाठी गमभन प्रकाशनातर्फे गेल्या १५ वर्षांपासून चित्रकला उपक्रम राबवले जातात तसेच दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. कोणत्याही कलेच्याबाबतीत बालवयामध्ये स्पर्धा नसावी, मुलांना कलेतून मुक्तपणे व्यक्त होता आले पाहिजे, असे मतही कडू यांनी व्यक्त केले. स्पर्धाविरहित प्रोत्साहन मुलांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे असते, असेही ते म्हणाले,
लहान मुले अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे पालक नित्यनेमाने वाचन करीत असतील, तर मुलांवर आपोआपच वाचनसंस्कृतीचे संस्कार होतात. बऱ्याचदा, पालक केवळ मुलांना ‘तू टीव्ही पाहण्याऐवजी वाचन कर,’ असे सांगत जबाबदारी झटकतात आणि स्वत: टीव्हीतील कार्यक्रमांमध्ये रंगतात. मुलांवर पालकांनी वर्तनातून संस्कार करणे अपेक्षित असते. घरात वाचनाचे वातावरण असेल तर मुलांचा वाचनाची गोडी लागते. संस्कार घडवता येत नसतात, ते आपोआप घडतात. मुलांवर साहित्याचे संस्कार करण्याची संयुक्तिक जबाबदारी लेखक आणि प्रकाशकांचीही आहे. कोणते बालसाहित्य मुलांसाठी योग्य आहे, याचा लेखक, प्रकाशकांनी विचार करणे गरजेचे आहे. मागणी तसा पुरवठा, हे सूत्र न राबवता मुलांच्या मानसिकतेचा विचार व्हायला हवा. आजची पिढी बौद्धिकदृष्ट्या पुढे गेली आहे. ही पिढी एखाद्या गोष्टीची सत्यता तपासून पाहत असल्याने परिकथांमध्ये रमत नाही. कपोलकल्पित आणि रंजक लेखन काही काळ भावते आणि मग मुलांच्या मनात नानाविध प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे लहान मुलांसाठी लेखन करताना त्यांच्या जीवनाशी निगडित बाबींवर प्रकाश टाकला पाहिजे. लहान मूल हे संपूर्ण स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना दरवेळी गृहित धरून चालणार नाही. बालसाहित्यातून मुलांचे भावविश्व रेखाटले गेले पाहिजे. आजूबाजूच्या प्रत्येक घटनेचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. अशाच धरणग्रस्त गावातील मुलांचे भावविश्व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकातून चित्रित केल्याचे कडू यांनी सांगितले. मुलांना साहित्याचा आणि निसर्गाचा थेट अनुभव घेता यावा, यासाठी पानशेतला विद्याविहार निसर्गशाळा आयोजिली जाते. यातून मुलांना भातलागवड, नांगरणी आदींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. त्यातूनच त्यांना प्रत्यक्ष आनंद मिळतो.