‘दैवाने दिले अन् कर्माने नेले’!

By admin | Published: February 26, 2017 03:39 AM2017-02-26T03:39:13+5:302017-02-26T03:39:13+5:30

मुळशी पंचायत समिती व जि. प. निवडणुकीत या वेळी राष्ट्रवादीला पाणी पाजणारच, या निश्चयाने उतरलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाला पौड-कासारआंबोली ग

'Drawn by devils and actions taken'! | ‘दैवाने दिले अन् कर्माने नेले’!

‘दैवाने दिले अन् कर्माने नेले’!

Next

पौड : मुळशी पंचायत समिती व जि. प. निवडणुकीत या वेळी राष्ट्रवादीला पाणी पाजणारच, या निश्चयाने उतरलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाला पौड-कासारआंबोली गट, कासारआंबोली गण व बावधन गणात यश मिळाले असले तरी हे यश नक्कीच समाधान देणारे नाही. उलट माण-हिंजवडी गट-गण आणि बावधन-पिरंगुट गट आणि गणात शिवसेनेचे तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी स्वत:कडे उमेदवारी घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि राष्ट्रवादीने त्यांना पराभवाची धूळ चारली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे यांचा राष्ट्रवादीच्या पांडुरंग ओझरकर यांनी माण गणात, प्राची बुचडे यांचा कोमल बुचडे यांनी हिंजवडी गणात, तर शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांचा राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शंकर मांडेकर यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. बावधन गणात राष्ट्रवादीतून ऐनवेळी सेनेत आलेले विजय केदारी यांना अन्य पक्षाच्या उमेदवारांच्या तुलनेत काहीसा योग्य उमेदवार म्हणून सर्व मतदारांनी, बाळासाहेब चांदेरे यांचा प्रभाव असलेल्या सुसच्या मतदारांनी व आपल्याच गावचा उमेदवार या नात्याने लवळे ग्रामस्थांनी दिलेल्या आघाडीमुळे विजय मिळाला.
पिरंगुट गणात मात्र पिरंगुटच्या मतदारांनी पुरेसा कौल न दिल्यामुळे व मुठा आणि मोसे खोऱ्यातील मतदारांनी कोंढरे यांना पसंती दिल्याने माजी सभापती बाळासाहेब पवळे यांना प्रचंड शक्ती खर्च करूनही आपल्या पत्नी संगीता पवळे यांचा अल्पशा मताने का होईना पराभव स्वीकारावा लागला. त्याचबरोबर याच गटाच्या उमेदवार शारदा ननावरे यानाही अंजली कांबळे यांच्या सरशीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

शिवसेनेच्या या यशापयशाचे दैवाने दिले कर्माने नेले अशीच झाली. मागील दोन वर्षापूर्वी ज्या जोषाने मुळशीतील शिवसैनिक एकवटलेले दिसले तो एकत्रितपणाचा जोष पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुका येईपर्यंतही टिकलेला दिसला नाही.
प्रत्येक जण स्वत:ला उमेदवारी मिळून एकला चलो रे या भूमिकेत निवडणुकीला सामोरे गेले. तालुक्यातील नेत्यांमध्ये योग्य समन्वय असता तर शिवसेनेला सहज सत्ता मिळविता आली असती.
यापूर्वी सत्तेवर आरूढ असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेदांत तडजोड करीत का होईना समाजासमोर आम्ही एकच आहोत हे चित्र निवडणूक कालावधीत तरी समाजासमोर निर्माण करण्यात यश मिळविले.
त्याचा परिणाम म्हणून या वेळी शिवसेनेला पंचायत समितीची सत्ता मिळविण्यास अनुकूल परिस्थिती असतानाही केवळ शिवसेनेतली अंतर्गत बंडाळी, भाजपाबरोबर फिस्कटलेली युती, मतदारांना विकासाची वाट दाखवणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या हातात पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या दिल्या.
येणाऱ्या काळात या अपयशापासून मुळशीच्या राजकारणातले शिवसेनानेते कोणता बोध घेणार आणि यापुढे कोणती पावले उचलणार, याकडे मुळशीकरांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: 'Drawn by devils and actions taken'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.