KYC अपडेटसाठी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याला पाठवली एक फाईल; डाउनलोड करतात गमावले १३ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:33 IST2025-01-02T16:33:03+5:302025-01-02T16:33:33+5:30
रिमोट ऍक्सेसद्वारे पुण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला सायबर गुन्हेगाराने तब्बल १३ लाख रुपयांना लुटले आहे.

KYC अपडेटसाठी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याला पाठवली एक फाईल; डाउनलोड करतात गमावले १३ लाख रुपये
Pune Cyber Fraud: गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रकार सामान्यांपासून उच्च शिक्षितांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे अनेकवेळा समोर आलं आहे. अशातच पुण्यातही सायबर फसवणुकीच्या आणखी एका प्रकरणात एका व्यक्तीची १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. पुण्यातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या पीडित महिलेची आर्थिक फसवणूक केलीय. महिलेच्या बँक खात्याशी संबंधित कथित केवायसी अपडेटबाबत अज्ञात व्यक्तींने पीडितेशी संपर्क साधला होता. अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या पालन करताच त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाले.
पुण्यातील प्रमुख संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील एका वरिष्ठ महिला तांत्रिक कर्मचाऱ्याला बँक अधिकारी म्हणून भासवून फसवणूक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या महिला कर्मचाऱ्याला रिमोट ऍक्सेस सायबर घोटाळ्याद्वारे १३ लाख रुपयांना लुटण्यात आलं. केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या फोनवर रिमोट ऍक्सेस ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितले आणि त्याच्या फोनचा ऍक्सेस घेऊन बँक खात्यातून पैसे काढले.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेने याप्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत, पीडितेने म्हटलं की, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात, तिला एका अनोळखी व्यक्तीकडून एक व्हॉट्सॲप मेसेज आला. मेसेजमध्ये दावा करण्यात आला की तिचे केवायसी डिटेल्स अपडेट बाकी आहेत. त्वरित ते अपडेट न केल्यास बँक खाते गोठवले जाईल असा इशारा त्या मेसेजमध्ये दिला होता. त्या मेसेजसोबत, अज्ञात व्यक्तीने एक फाईल देखील पाठवली होती. ती डाउनलोड करण्यास सांगितले होते.
केवायसी अपडेटची आठवण करून देण्यासाठी बँकेकडून आलेला हा खरा मेसेज आहे असे समजून पीडितेने त्या फाईलवर क्लिक केले आणि फाइल त्याच्या स्मार्टफोनवर डाउनलोड केली. या फाइलमध्ये सायबर गुन्हेगाराने त्याच्या डिव्हाइसमध्ये रिमोट ॲक्सेस देण्यासाठी एक डिझाइन केलेले मालवेअर ॲप्लिकेशन पाठवले होते. फाइल डाउनलोड केल्यानंतर काही वेळातच पीडितेला तिच्या फोनवर अनेक ओटीपी आले. मात्र, त्या क्षणी पीडित महिलेने कोणताही व्यवहार केला नसल्यामुळे तिने या ओटीपी मेसेजकडे दुर्लक्ष केले.
या मेसेजनंतर आरोपीने रिमोट ऍक्सेसचा गैरफायदा घेऊन पीडितेच्या बँक खात्यातून रु. १२.९५ लाख काढले. या व्यवहारांबद्दलचे मेसेज पाहिल्यानंतरच पीडितेने गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी तातडीने पुणे शहर सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधला. प्राथमिक तपासानंतर येरवडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अज्ञात फाइल डाउनलोड केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने पैसे गमावल्याची ही पहिलीच घटना नाही.